अमरावती: व्‍याजासह कर्जाची रक्‍कम परत केल्‍यावरही व्‍याज शिल्‍लक असल्‍याचे सांगून ते वसूल करण्‍यासाठी तगादा लावणाऱ्या सावकार महिलेच्‍या जाचाला कंटाळून एका महिलेने आत्‍महत्‍या केल्‍याची घटना नांदगाव खंडेश्वर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृत महिलेचा मुलगा ओम जीवनधर लेकुरवाळे (२२, नांदगाव खंडेश्वर) याच्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्‍वर पोलिसांनी एका ५५ वर्षीय महिलेविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

आरोपी महिलेकडून ओमच्या आईने काही रक्कम व्याजाने घेतली होती. त्यांनी ती रक्कम व्याजासह परत देखील केली. मात्र, तरीही व्‍याजाचे पैसे शिल्लक आहेतच, असा दावा ही महिला करीत होती. ती रक्कम परत करण्यासाठी तिने तगादा लावला. त्यामुळे ओमची आई मानसिकदृष्‍ट्या खचली. संपूर्ण रक्‍कम परत केल्यानंतरही कुठून पैसे द्यायचे, ही चिंता त्‍यांना भेडसावत होती.

हेही वाचा… ‘नियम तोडण्‍यात तुम्‍ही आघाडीवर आणि मला नियम…. नितीन गडकरींनी सांगितला पंतप्रधानांचा किस्‍सा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपीने व्‍याजाच्‍या वसुलीसाठी मानसिक त्रास दिला. तो त्रास सहन न झाल्याने ओम लेकुरवाळे याच्या आईने २३ जुलै रोजी आत्महत्‍या केली. आपल्या आईला मानसिक त्रास देऊन सावकार महिलेनेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार ओमने दिली. त्या तक्रारीवरून नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपी सावकार महिलेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.