अकोला : ऐन पोळा सणाच्या दिवशी बैल धुताना नदीत तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील खोळद गावाजवळ शुक्रवारी घडली. या घटनेमुळे ऐन पोळा सणाच्या दिवशी गावात शोककळा पसरली आहे.
सण, उत्सवांची प्राचीन परंपरा निरंतर चालत आली. चातुर्मासात पालखी, कावड महोत्सव, पोळा उत्सव, गणपती विसर्जन मिरवणूक आदी मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पोळा सणाची अकोल्यात वैशिष्ट्यपूर्ण प्रथा आहे. कृषिप्रधान संस्कृतीतील पोळा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या सणाच्या निमित्ताने बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. पोळ्यानिमित्त बैलांना धुवून खांद्याला हळद व तुपाने शेकतात, पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे तोडे घालतात.
गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो. पोळा सणानिमित्त जिल्ह्यात आनंद व उत्साहाचे वातावरण होते. मात्र एका दुर्दैवी घटनेने आनंदावर विरजण पडले. पोळा सणाच्या निमित्ताने बैलाला नदीवर धुण्यासाठी नेल्यावर तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली.
मूर्तिजापूर तालुक्यात येणाऱ्या माना पोलीस ठाण्यांतर्गत खोळद गावाजवळ पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी शंतनू अविनाश मानकर (२५) हा पिढी नदीच्या पात्राजवळ गेला होता. नदीतील पुराच्या प्रचंड प्रवाहात तरुण वाहून गेला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे खोळद गावात शोककळा पसरली आहे. मानकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. शंतनू हा अविनाश मानकर यांचा एकुलता एक मुलगा होता.
कृषी विद्यापीठात बैलपोळा साजरा
कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्य करणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत बैलपोळा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन केंद्रात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संशोधन संचालक डॉ. शामसुंदर माने, अधिष्ठाता कृषी डॉ. देवानंद पंचभाई, विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, अधिष्ठाता अभियांत्रिकी डॉ. सुरेंद्र काळबांडे, अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. अरविंद सोनकांबळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेश हरणे, डॉ. संजय भोयर, डॉ. शेषराव चव्हाण, विद्यापीठ नियंत्रक राजीव कटारे, मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. वर्षा टापरे, एकात्मिक शेती संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. जयंत देशमुख, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.