नागपूर : मेकोसाबाग उड्डाणपुलावरून एका तरुणीने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. गंभीर जखमी अवस्थेत तरुणीवर उपचार सुरु होता. मात्र, गुरुवारी सायंकाळी त्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तनुजा (२०, आवळेनगर) असे मृत तरुणीचे नाव आहे. तनिष्काने प्रेमप्रकरणातून आलेल्या अपयशाने खचल्यानंतर उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कपिलनगर पोलीस ठाण्याअंतर्गत राहणारी तनुजाचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. बुधवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ती घरून पायी मेकोसाबाग उड्डाण पुलावर गेली. दुपारच्या वेळी या पुलावर वर्दळ नसते. बराच वेळ ती पुलावर फिरत होती. अखेर हिम्मत एकवटून ती पुलाच्या भिंतीवर उभी झाली आणि क्षणात उडी घेतली. गंभीर जखमी अवस्थेत तिला नागरिकांनी खाजगी रूग्णालयात नेले.
हेही वाचा >>>प्राचार्य भाऊसाहेब देशमुख स्मृती ‘संतसेवक’ पुरस्काराने विजय मंथनवार यांचा सन्मान
माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच तनुजाचे आई-वडिल आणि भाऊ रूग्णालयात पोहोचले. एपीआय सोनवणे यांनी नातेवाईकांची आस्थेने विचारपूस केली.तनुजाची प्रकृती चिंताजनक होती. शेवटी गुरुवारी सायंकाळी तनिष्काचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तनुजाने उडी घेतल्यानंतर ती रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होती. या घटनेचे काही लोकांनी मोबाईलव्दारे चित्रीकरण केले आणि समाजमाध्यमांवर पाठविले. तो व्हिडीओ तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचला. नातेवाईकांनी पोलीस अधिकारी सोनवने यांचा भ्रमणध्वनी मिळविला आणि रूग्णालयात पोहोचले. तेव्हा जखमी तरुणीची ओळख पटली.
हेही वाचा >>>वादळी वाऱ्यासह पावसाचा धोका, ‘रुफ टॉप रेस्टॉरन्ट’किती सुरक्षित ?
कुटुंबियांचा विरोध
तनिष्काचे इमारतीच्या बांधकामावर मिस्त्रीकाम करणाऱ्या युवकाशी प्रेमसंबंध होते. दोघांना प्रेमविवाह करायचा होता. मात्र, त्यांच्या प्रेमाला युवकाच्या कुटुंबियांचा विरोध होता. तसेच प्रियकराच्या कुटुंबियांनी तिला दमदाटी केल्याची माहिती समोर आली होती. प्रियकरानेही तिला लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या तनुजाने उड्डाणपुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता जरीपटका पोलिसांनी वर्तवली आहे.
आत्महत्यांचे प्रमाण वाढले
गेल्या काही महिन्यांपासून प्रेम प्रकरणात आलेल्या अपयशातून खचलेल्या प्रियकर आणि प्रेयसी यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यापूर्वी वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा एका तरुणीने प्रेमात दगा मिळाल्यानंतर आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. तसेच आता जरीपट्यात राहणाऱ्या तरुणीने सुद्धा प्रेमात आलेल्या अपयशामुळे उड्डाणपूरावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही बाब पालक वर्गासाठी चिंताजनक आहे.