अकोला : वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात येणाऱ्या एका गावातील रहिवासी २० वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन अहिल्यानगरमधील एका गावात नेले. त्या ठिकाणी खोलीमध्ये तरुणीवर आरोपीने बळजबरीने दोन महिने वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीच्या अत्याचाराला कंटाळून पीडित तरुणीने परत आल्यावर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या संतापजनक प्रकरणात वाशीम जिल्ह्यातील जऊळका पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तनुज गौरकार याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून नराधम आरोपीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यात अल्पवयीन मुली, तरुणी व महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या प्रकारामध्ये मोठी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. घरात देखील मुली सुरक्षित नसल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट होते. महिला अत्याचाराविरोधात कठोर कायदे असतांनाही नराधमांकडून शोषण केले जात असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाशीम जिल्ह्यातील अशाच एका घटनेने मोठी खळबळ उडाली. मालेगाव तालुक्याच्या एका गावातील २० वर्षीय तरुणीला अहिल्यानगर जिल्ह्यात नेऊन नराधम तरुणाने जीवे मारण्याची धमकी देत सतत लैंगिक शोषण केले. अखेर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम आरोपी तरुणीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

एप्रिल महिन्यात नराधम आरोपी तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन वाशीम जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील घडवणी गावात घेऊन गेला. त्या ठिकाणी एका खोलीमध्ये आरोपीने तरुणीला ठेवले होते. तरुणीवर नराधम आरोपीने बळजबरीने वारंवार अत्याचार केले. नराधम आरोपीचा सततचा त्रास वाढला होता. या त्रासाला पीडित तरुणी कंटाळली. त्रास असहाय्य झाल्याने अखेर हिम्मत करून पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घटनेची सविस्तर माहिती देऊन लेखी तक्रार दाखल केली. पीडित तरूणीच्या तक्रारीवरून नराधम आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले. तपासासाठी विविध पथके रवाना केली. अखेर आरोपी तनुज गौरकार याला ताब्यात घेण्यात आले. पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी नराधम तरुण आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाशीम पोलीस करीत आहेत.