अकोला : गद्दारांनी घटनाबाह्य सरकार स्थापन करून शिवसेनेसह महाराष्ट्रातील जनतेला मोठा धोका दिला. येत्या काही महिन्यात गद्दारांचे घटनाबाह्य सरकार कोसळणार, अशा शब्दात युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत, आ. नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा >>> नागपूर : मुंबई, पुणे, औरंगाबादकडे उद्योग न्यायचे थांबवा : आमदार वंजारी

‘ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा खुर्ची खाली करा,’ अशी घोषणा देत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर चौफेर टीका केली. राज्यातील वातावरण तापले आहे. एकीकडे शिवसेनेचे निष्ठावंत लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिक आहेत, तर दुसऱ्या बाजूला विश्वासघात करणारे ४० गद्दार आहेत. या गद्दारांनी धोका देऊन सरकार बनवले. हे सरकार शेतकरी, युवक, महिला, उद्योजक आदींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असून ते कुणाचीही ऐकत नाहीत. शेतकऱ्यांना होणारा त्रास आम्हाला कळतोय. अतिवृष्टी झाली, पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. महाविकास आघाडी सरकार असते तर आतापर्यंत ओला दुष्काळ जाहीर झाला असता. या सरकारलादेखील ओला दुष्काळ जाहीर करायला आम्ही भाग पाडू, असे आदित्य म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> नागपूर : शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या संघटनांसमोर पेच

राज्यात कृषिमंत्री कोण आहेत, हे देखील अनेकांना माहिती नाही. ते कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी आले नाहीत. त्यांनी ‘छोटा पप्पू’ म्हणून मला हिणवले. सर्वसामान्यांचे भले होणार असेल तर माझ्यावर कुठल्याही शब्दात टीका करा, हरकत नाही. या ‘छोट्या पप्पूने’च तुम्हाला पळायला लावले आहे, हे विसरू नका, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांना प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे केवळ मुख्यमंत्रीच नव्हते तर महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख होते. त्यांनी दिलेले वचन महाविकास आघाडीने पूर्ण करीत शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले, असे सांगायलाही ते विसरले नाही. सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

शिवसैनिकाच्या चहाच्या गाडीला भेट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अकोल्यात आपल्या दौऱ्यादरम्यान निष्ठावंत शिवसैनिकाच्या चहाच्या गाडीला भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. आदित्य ठाकरेंच्या भेटीने शिवसैनिक भारावून गेले होते.