लोकसत्ता टीम

यवतमाळ : जिल्ह्यात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून गावगुंडांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिसांनी सक्रिय गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.

गुन्हेगारी वर्तुळाच्या बळावर दहशत पसरविणाऱ्या गुंडाना चांगल्या वर्तणुकीची तंबी दिली जात आहे. अशा गुंडांकडून प्रतिज्ञापत्रावर चांगल्या वर्तनाची हमी लिहून घेतली जात आहे. गेल्या तीन महिन्यांत पोलिसांनी १७ आरोपींना तडीपार करत जिल्हाबंदी केली आहे. काहींना सहा तर काहींवर एक वर्षासाठी ही बंदी घातली आहे. कलम १०७, १०९ आणि ११० नुसार एक हजार ७८० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा-पंतप्रधान मोदींची वर्धेतही सभा? रामदास तडस यांना खात्री, ते म्हणतात…

निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिततेचे पालन व्हावे, कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी सुरुवातीपासूनच सक्रिय गुन्हेगारांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. एकदा गुन्हेगाराला वर्तन सुधारण्याची संधी दिली जाते. पुन्हा त्याच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेतले जाते. यातील अटी-शर्तीचा भंग केल्यास कारवाई करण्यात येते. हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय – दंडाधिकाऱ्यांकडून मंजूर होताच थेट कारवाईचा बडगा उगारून आरोपींना जिल्ह्याबाहेर काढले जात आहे. जिल्ह्यात हाभट्टीची दारू गाळणे, अवैध दारू विक्री, जुगार भरवणे, रेती तस्करी, जनावर तस्करी, गुटखा तस्कर अशा सराईत गुन्हेगारांवरही पोलिसांची करडी नजर आहे. या गुन्हेगारांकडून कायद्याचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. अशा आरोपीच्या वर्तनात सुधारणा झाली नाही तर थेट हद्दपारीची कारवाई प्रस्तावित केली जात आहे.

आणखी वाचा-उमेदवारांचं चांगभलं! प्रचार साहित्याच्या दरात अखेर कपात; लोकसभा निवडणुकीत…

सराईत गुन्हेगारांकडून भविष्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, असे हमीपत्र आरोपीकडून भरून घेण्यात आले आहे. त्यासाठी पोलीस मुख्यालयात संपूर्ण जिल्ह्यातील सराईतांना बोलावून त्यांना सूचना देण्यात आली. प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये जिल्ह्यात यवतमाळ उपविभाग पहिल्या क्रमांकावर आहे. तर पांढरकवडा उपविभागात दुसऱ्या क्रमांकावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे. कुणीही त्याचे उल्लंघन करू नये. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी गुन्हेगारांना दिला आहे.