२४ तासांत २८ मृत्यू; नवीन १,१५१ रुग्ण

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत २८ करोना रुग्णांचा मृत्यू झाला तर १ हजार १५१ नवीन रुग्णांची भर पडली.  सातत्याने नवीन रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्तांची संख्या जास्त असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या २० हजारांहून खाली आली आहे.

शहरातील १० हजार ३४, ग्रामीणचे ९ हजार २१२ असे एकूण १९ हजार २४६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ४ हजार ६० रुग्ण विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये  तर १५ हजार १८६ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. तर गुरुवारी शहरात ९, ग्रामीणला ८, जिल्ह्य़ाबाहेरील ११ अशा एकूण २८ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ५ हजार १७१, ग्रामीण २ हजार २२०, जिल्ह्य़ाबाहेरील ११ अशी एकूण जिल्ह्य़ात ८ हजार ६८५ रुग्णांवर पोहोचली आहे. याशिवाय शहरात ५६२, ग्रामीणला ५७८, जिल्ह्य़ाबाहेरील ११ असे एकूण १ हजार १५१ रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाबाधितांची संख्या ३ लाख २७ हजार ९८८, ग्रामीण १ लाख ३८ हजार ४६७, जिल्ह्य़ाबाहेरील १ हजार ४७६ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख ६७ हजार ९३१ रुग्णांवर पोहोचली आहे.

सकारात्मक अहवालाचे प्रमाण घसरले

शहरात दिवसभरात १३ हजार ७८१, ग्रामीणला ५ हजार ४३६ अशा एकूण १९ हजार २१७ चाचण्या झाल्या. त्यांचे अहवाल शुक्रवारी अपेक्षित आहेत. परंतु बुधधारी तपासलेल्या २० हजार ३६ नमुन्यांत १ हजार १५१ रुग्णांना करोना असल्याचे निदान झाले. त्यामुळे सकारात्मक अहवालाचे प्रमाण ५.७४ टक्के नोंदवले गेले.

४५ वर्षांवरील नागरिकांना आज कोविशिल्ड मिळणार

राज्य शासनाच्या निर्देशानुसार ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना उद्या शुक्रवारी कोविशिल्ड लशीची पहिली व दुसरी मात्रा दिली जाईल. राज्य शासनाने या वयोगटातील नागरिकांना दोन्ही मात्रा देण्यासाठी लस उपलब्ध करून दिली आहे. केंद्र शासनाच्या नवीन निर्देशानुसार आता कोविशिल्डची दुसरी मात्रा १२ ते १६ आठवडय़ांत द्यावयाची आहे. ज्या  नागरिकांनी कोविशिल्डची पहिली मात्रा १२ आठवडय़ांपूर्वी घेतली त्यांना दुसरी मात्रा दिली जाईल. महापालिकेच्या सर्व केंद्रांवर लसीकरण केले जाईल. आरोग्य सेवक, फ्रंटलाईन वर्कर यांना सुद्धा  दुसरी मात्रा दिली जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बॅरिस्टर राजाभाऊ  खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशीनगर झोनच्या मागे  (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय) व स्व. प्रभाकर दटके महाल रोगनिदान केंद्र येथे कोव्हॅक्सिनची फक्त दुसरी मात्रा उपलब्ध आहे.

विदर्भात मृत्यूसंख्या आणखी घटली!

विदर्भातील अकरा जिल्ह्य़ांमध्ये गुरुवारी मृत्यू संख्या बुधवारच्या तुलनेत आणखी खाली आली. २४ तासांत १२८ रुग्णांचा मृत्यू तर ५ हजार ४०७ नवीन रुग्णांची भर पडली. विदर्भात १७ मे रोजी १४७, १८ मे रोजी १६३, १९ मे रोजी १३७ करोनाग्रस्तांचे मृत्यू झाले होते. २४ तासांत नागपुरात ९, ग्रामीण ८, जिल्ह्य़ाबाहेरील ११, अशा एकूण २८ रुग्णांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत १ हजार १५१ नवीन रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील २१.८७ टक्केमृत्यूंचा समावेश आहे. अमरावतीत १८ मृत्यू तर ८७९ रुग्ण, चंद्रपूरला ११ मृत्यू तर ५५३ रुग्ण, गडचिरोलीत ८ मृत्यू तर १८० रुग्ण, यवतमाळला १४ मृत्यू तर ४४३ रुग्ण, भंडाऱ्यात ३ रुग्णांचा मृत्यू तर १३८ रुग्ण, गोंदियात ४ मृत्यू तर ९८ रुग्ण, वाशीमला ७ मृत्यू तर ४०६ रुग्ण, अकोल्यात १८ मृत्यू तर ६७० रुग्ण, बुलढाण्यात ४ मृत्यू तर ५९१ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात १३ मृत्यू तर २९८ नवीन रुग्ण आढळले.

‘डिलेव्हरी बॉय’ची आरटीपीसीआर चाचणी

लॉकडाऊनमुळे शहरात ऑनलाइनद्वारे खाद्यपदार्थाची मागणी वाढली आहे. ते घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचवत असल्याने खरबदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने शहरातील स्विगी डिलेव्हरी बॉयची आरटीपीसीआर तपासणी करण्याचा निर्णय घेतला. बुधवारपासून सिव्हिल लाईन्समधील विशेष शाखा कार्यालयात परिसरात या उपक्रमाला सुरुवात झाली. शहरात तब्बल ४५० डिलेव्हरी बॉय असून, त्यांची तपासणी करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष शाखेचे उपायुक्त डॉ. बसवराज तेली, महापालिकेचे डॉ. शुभम मनगटे, डॉ. साहिल व त्यांची चमू ही तपासणी करीत आहे.

करोनामुक्तांचे प्रमाण ९४.०३ टक्क्य़ांवर

शहरात दिवसभऱ्यात १ हजार ३६६, ग्रामीणला २ हजार ३९ असे एकूण  ३ हजार ४०५ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख १३ हजार २९३, ग्रामीण १ लाख २६ हजार ७०७ अशी एकूण जिल्ह्य़ात ४ लाख ४० हजार व्यक्तींवर पोहोचली आहे.