इतर कोणत्याही अभ्यासक्रमांपेक्षा निम्न मध्यमवर्गीयांना अभियांत्रिकीत शिक्षण घेण्याची संधी खुणावत असते. मात्र, खर्च परवड नाही. त्यांच्यासाठी पदविका अभियांत्रिकी (डी.ई.) राजमार्ग ठरला आहे.
कला, विज्ञान, वाणिज्य शाखांतून पदवी शिक्षण घ्यावे, अभियांत्रिकी, वैद्यकीय, चार्टर्ड अकाऊंटन्ट पदवी घ्यावी की कमी खर्चाचे मात्र नोकऱ्यांच्या खात्रीचे प्रमाण असलेले अभियांत्रिकी पदविका, आयटीआयकडे वळायचे, असा गोंधळ सामान्य विद्यार्थ्यांच्या मनात असतो. पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात थेट द्वितीय वर्षांला प्रवेश मिळतो. त्यासाठी २० टक्के जागा राखीव असतात. त्याचप्रमाणे अभियांत्रिकीत द्वितीय वर्षांतील रिक्त जागांवरही प्रवेश मिळतो. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये डी.ई.साठी ६,५०० रुपये खर्च आहे, तर खासगी तंत्रनिकेतनमध्ये हा खर्च ३० ते ४० हजार एवढा आहे. दहावी उत्तीर्णतेची अट केवळ या अभ्यासक्रमासाठी असून महाराष्ट्र स्तरावर केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होते. विद्यार्थी आवडीनुसार शाखा निवडतात. इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, संगणक, ऑटोमोबाईल इत्यादी अभ्यासक्रमांसाठी ७० टक्के जागा त्या जिल्ह्य़ातील रहिवासी विद्यार्थ्यांसाठी, तर ३० टक्के इतर जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात. त्यातही मुलींसाठी ३० टक्के आरक्षण मिळते. तसेच खुल्या प्रवर्गातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के अतिरिक्त जागा राखीव असतात. पदवी अभियांत्रिकीचे शिक्षण महागडे आहे.
विज्ञान शाखेतून ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्यावरच अभियांत्रिकीत शिक्षण शक्य आहे. सीईटी, जेईई या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम गुण प्राप्त करणे गरजेचे असते. ही प्रक्रिया पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण घेताना पार पाडावी लागत नाही.
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम केल्यानंतर कामगारांचे नियंत्रण, यंत्र दुरुस्ती, व्यवस्थापनाशी समन्वय इत्यादींसाठी पदविकाधारकांना महत्त्व आहे. पदविकेचे शिक्षण कौशल्यावर आधारित असून थेअरीबरोबरच प्रात्यक्षिकांचा मोठय़ा प्रमाणात अंतर्भाव या अभ्यासक्रमात असतो. अभ्यासक्रम पूर्ण केल्याबरोबर कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी प्राप्त होतात. स्वयंरोजगार सुरू करता येतो. पुढे शिकायचे असेल तर थेट अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षांला प्रवेश मिळतो.
– डॉ. विकास डोंगरे, विभाग प्रमुख अणुविद्युत विभाग, शासकीय तंत्रनिकेतन, वाशीम