नागपूर : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी घडलेल्या अभूतपूर्व प्रकारात एका वकिलाने वस्तू (चप्पल किंवा कागदाचा गुंडाळा) फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर न्यायालयीन कामकाज काही मिनिटे थांबले, मात्र सरन्यायाधीशांनी अत्यंत संयम राखत सुनावणी पुन्हा सुरू केली. हल्ला करणारा वकील राकेश किशोर (वय ७१) हा खजुराहोतील भग्नावस्थेतील भगवान विष्णू मंदिराच्या पुनर्स्थापनेसाठी दाखल याचिका फेटाळल्याबद्दल असंतुष्ट होता, अशी माहिती नंतर समोर आली.
पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, राकेश किशोर हे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे नोंदणीकृत सदस्य आहेत आणि ते दिल्लीच्या मयूर विहार परिसरात राहतात. त्यांनी २००९ मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये नोंदणी केली होती. ज्येष्ठ वकील असलेले राकेश किशोर हे अनेक वर्षांपासून विविध बार असोसिएशन्सचे सदस्य राहिले आहेत. पोलिसांना राकेश किशोर यांच्याकडे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन, शाहदरा बार असोसिएशन आणि दिल्ली बार कौन्सिलचे सदस्यत्व कार्ड असल्याचे आढळले होते. आता राकेश किशोर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्लेखनीय आहे की सरन्यायाधीश गवई यांनी याप्रकरणी स्वतः कोणताही गुन्हा दाखल करण्यास नकार दिला होता.
कुठे दाखल झाला गुन्हा?
बेंगळुरू पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चप्पल फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा बेंगळुरू शहरातील विधानसौध पोलीस ठाण्यात “झिरो एफआयआर” म्हणून नोंदवण्यात आला आहे. ‘झिरो एफआयआर’ म्हणजे गुन्हा ज्या ठिकाणी घडला त्या क्षेत्रातील अधिकारक्षेत्रात पुढे पाठविण्यासाठी प्रारंभिक स्वरूपात नोंदवलेली तक्रार.
या एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहिता मधील कलम १३२ आणि १३२ अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. कलम १३२ हे “शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याला रोखण्यासाठी केलेला हल्ला किंवा बळाचा वापर” यासंदर्भात आहे, तर कलम १३३ हे “जाणीवपूर्वक अपमान करून सार्वजनिक शांततेला बाधा आणण्याच्या उद्देशाने केलेल्या कृती” संदर्भात आहे.
ही कारवाई ऑल इंडिया अॅडव्होकेट्स असोसिएशन, बेंगळुरू यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. या संघटनेने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवून ती न्यायव्यवस्थेच्या आणि कायद्याच्या अधिष्ठानाच्या प्रतिष्ठेवर झालेला अपमान असल्याचे म्हटले आहे.
ही घटना सोमवारी सकाळच्या सत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट क्रमांक १ मध्ये घडली होती. सुनावणीदरम्यान राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश गवई यांच्याकडे चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला. तत्काळ सुरक्षारक्षकांनी त्यांना आवरले. त्यावेळी ते “सनातन का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान” अशी घोषणा करत होते.
घटनेनंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोर यांचे सदस्यत्व निलंबित केले आणि त्यांच्या वर्तनाला “वकिली व्यवसायाच्या प्रतिष्ठेला न शोभणारे” असे म्हटले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे निबंधक यांनी पुढील कारवाई न करण्याचा निर्णय घेतल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना सोडून दिले. दरम्यान, एका वकिलाने ॲटर्नी जनरल यांच्याकडे पत्र पाठवून किशोर यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान कारवाईसाठी परवानगी मागितली आहे.
या घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, तसेच मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, पिनराई विजयन, सिद्दरामय्या, रेवंत रेड्डी, ममता बॅनर्जी आणि इतर अनेक राजकीय नेत्यांनी या कृतीचा निषेध करून सरन्यायाधीश गवई यांच्याशी ऐक्य व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन, सर्वोच्च न्यायालय अॅडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशन, तसेच विविध उच्च न्यायालयांच्या प्रमुख बार असोसिएशननीही या प्रकाराचा कठोर शब्दांत निषेध केला.