भंडारा: धान कापणी सुरू असताना अचानक विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. वीज पडण्याच्या भितीपोटी झाडाच्या आश्रयाला गेलेल्या झाडावरच वीज कोसळली आणि दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल घडली.

शेतातून धान कापणी करत असताना पाऊस सुरू झाल्याने झाडाखाली थांबलेल्या दोघांचा वीज पडून मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता अड्याळ परिसरातील पिंपळगाव येथे घडली. स्थानिकांनी घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना दिली. त्यानंतर जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेमुळे पिंपळगाव परिसरात शोकाकुल वातावरण आहे.

विजय सिंग (४५, रा. मथुरा, उत्तर प्रदेश), कांता रमेश जिभकाटे (वय ५५, रा. पिंपळगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी महेश तेजा (वय ३०) आणि पिंपळगाव येथील रहिवासी संजय गाडेकर (वय ४५) यांचा समावेश आहे.

झाडाखाली थांबले असता पडली वीज

विजय सिंग आणि महेश तेजा हे कापणी यंत्र घेऊन उत्तर प्रदेशहून जिल्ह्यात आले होते. मंगळवारी पिंपळगावमध्ये शेतकरी आणि कापणी यंत्रे असलेले मजूर धान कापणी करत होते. यावेळी संध्याकाळी जोरदार पाऊस सुरू झाल्याने सर्वजण एका झाडाखाली थांबले. यावेळी अचानक झाडावर वीज कोसळल्याने विजय सिंग आणि कांता रमेश जिभकाटे यांचा जागीच मृत्यू झाला. तर महेश तेजा आणि संजय गाडेकर हे गंभीर जखमी झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

स्थानिकांनी घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना अड्याळच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. तेथील डॉक्टरांनी जखमींवर उपचार सुरू केले आहेत. सध्या जिल्ह्यात उन्हाळी धान पिकाची कापणी सुरू आहे. अवकाळी पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत.