लोकसत्ता टीम

नागपूर : मोसमी पावसाने राज्यात थोड्या कालावधीसाठी नाही तर तब्बल दोन आठवड्याहून अधिक काळ विश्रांती घेतली होती. मात्र, पावसाची ही विश्रांती आता संपली असून तो पुढे सरकला आहे. राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतही पुन्हा पावसाने प्रवेश घेतला असून काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली.

यंदा रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले, पण हवामान खात्याने शेतकऱ्याच्या आशा पल्लवीत ठेवल्या. खात्याच्या अंदाजानुसार मृग नक्षत्रात दमदार पावसाचा अंदाज देण्यात आला. मात्र, या नक्षत्राचा प्रवास संपण्याच्या वाटेवर असतानाही दमदार पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. सुरुवातीच्या पावसावर आणि हवामान खात्याने दाखवलेल्या आशेमुळे काही शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. तर काही ठिकाणी पाऊसच नसल्याने पेरण्या देखील रखडल्या. सलग दोन आठवडे पावसाने दडी मारल्याने पेरणी करणारा आणि पेरणी न झालेला शेतकरी हतबल झाला आहे. आभाळी वातावरणाने शेतकरीच नाही तर नागरिकांनाही पावसाचे वेध लागतात, पण पाऊस प्रत्येकवेळी पाठ फिरवत असल्याचे चित्र या दोन आठवड्यात तयार झाले होते.

आणखी वाचा-वार्धक्यामुळे बँकेचे व्यवहार करू न शकणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा

दरम्यान, आजपासून राज्यातील अनेक भागात मोसमी पावसाचा जोर वाढला आहे. राजधानी मुंबई ओलिचिंब झाली आहे. तर हवामान खात्याने आज, गुरुवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात मोसमी पावसाने हजेरी लावली, पण त्यानंतर मोसमी पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे उर्वरित विदर्भाला अजूनही मोसमी पावसाची प्रतिक्षा आहे.

आणखी वाचा-“मोदी विरोधकांनी एकत्र येऊन मतदान केले, पण आम्‍ही…”, नवनीत राणा यांची खंत; म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमवारी तब्बल दोन तास उपराजधानीत मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्याही आशा पल्लवीत केल्या. मात्र, त्यानंतर आभाळी वातावरणावरच समाधान मानावे लागत आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने गुरुवारी मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, कोकण याठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. तर कोकण, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये मूसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हा पाऊस तरी समाधान देईल की खात्याचा इशारा फक्त इशाऱ्यापुरताच मर्यादित राहील, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.