नागपूर: न्या. भूषण गवई यांनी १४ मे रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. न्या. गवई हे विदर्भातील अमरावती जिल्ह्यातून येतात. सरन्यायाधीशपदाची शपथ घेतल्यावर अगदी दोन आठवड्याच्या कालावधीत विदर्भातील आणखी एक न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती पदापर्यंत पोहोचले आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्या रूपाने विदर्भाचे आणखी एक प्रतिभासंपन्न सुपुत्र सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी विराजमान होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने सोमवारी न्यायमूर्ती चांदूरकर यांच्यासह कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन. व्ही. अंजरिया व गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विजय बिश्नोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली.

यापूर्वी विदर्भातून न्या. मोहम्मद हिदायतुल्ला, न्या. जनार्दन मुधोळकर, न्या. ए. पी. सेन, न्या. विकास सिरपूरकर, न्या. शरद बोबडे व न्या. भूषण गवई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली आहे. यापैकी न्या. हिदायतुल्ला व न्या. बोबडे यांनी सरन्यायाधीश पदही भूषविले व सध्या न्या. गवई सरन्यायाधीश पदी कार्यरत आहेत.

नागपूरशी विशेष ऋणानुबंध

न्या. चांदूरकर यांचा जन्म ७ एप्रिल १९६५ रोजी भुसावळ येथे झाला. त्यांचे वडील शरच्चंद्र चांदूरकर विदेश संचार निगमचे अधिकारी होते. त्यामुळे त्यांनी पुणे येथील सेंट व्हिन्सेंट हायस्कूलमधून शालेय शिक्षण व नेस वाडिया महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले, तर आयएलएस विधि महाविद्यालयातून एलएल. बी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी २१ जुलै १९८८ पासून मुंबई येथे वरिष्ठ अॅड. बी. एन. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. अॅड. नाईक पुढे चालून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले.

दरम्यान, न्या. चांदूरकर १९९२ मध्ये नागपुरात स्थायिक झाले. त्यांनी येथील विविध न्यायालयांमध्ये वकिली करताना संवैधानिक, दिवाणी, फौजदारी, प्रशासकीय असे विविध प्रकारचे विषय प्रभावीपणे हाताळले. आता न्या. चांदूरकर हेदेखील सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्यामुळे देशभरात विदर्भाचा सन्मान वाढणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्या. चांदूरकर यांची २१ जून २०१३ रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अतिरिक्त न्यायमूर्ती पदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर २ मार्च २०१६ रोजी त्यांना सेवेत कायम करण्यात आले. ते नोव्हेंबर-२०२३ पर्यंत नागपूर खंडपीठात कार्यरत होते. पुढे सेवाज्येष्ठतेनुसार ते मुंबई मुख्यालयात स्थानांतरित झाले. त्यांचे काका न्या. मधुकर चांदूरकर मुंबई व मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते.