शंभर वर्षे पूर्ण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नोव्हेंबर महिना उलटून गेल्यानंतरही अद्यापही हिवाळी परीक्षांची घोषणा झाली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे, सत्र संपत आले मात्र अद्याप परीक्षेचे अर्ज स्वीकारले नसल्याने महाविद्यालयांसमोरही अडचणी उभ्या झाल्या आहेत.
विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षांचा निकाल सहा महिने जाहीर न झाल्यानंतर आता हिवाळी परीक्षांनाही विलंब होत असल्याचे चित्र आहे. शिवाय परीक्षा होत नसल्याने सगळ्याच महाविद्यालयांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण परीक्षा विभागाकडून कोणत्याही सूचना दिल्या जात नाहीत. महाविद्यालयांना परीक्षेशी संबंधित अनेक तयारी करावी लागते. सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज स्वीकारून विद्यापीठाकडे पाठवायचे आहे. नियमानुसार, नवीन सत्रात प्रवेश घेतांना किंवा एका सत्राचा निकाल जाहीर झाल्यापासून ५ दिवसांच्या आत पुढील सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज भरावे लागतात.
हेही वाचा: नागपूर: धवनकरांच्या चौकशीनंतर आरोपपत्र!; कुलगुरूंनी खंडणी प्रकरणात मागितले स्पष्टीकरण
मात्र, आता प्रथम सत्र संपले असतानाही परीक्षा अर्ज कधी स्वीकारायचे यासंदर्भात विद्यापीठाकडून कोणतीही सूचना आलेली नाही. अशा स्थितीत विद्यापीठाची कार्यप्रणाली सध्या महाविद्यालयांसाठी अडचणीची ठरली आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठाने जाहीर केलेल्या सुधारित शैक्षणिक दिनदर्शिकेनुसार हिवाळी परीक्षा ऑक्टोबरपासून सुरू होणार होती. माजी विद्यार्थ्यांची परीक्षा ३ ऑक्टोबरपासून सुरू होणार होती, तर २१ नोव्हेंबरपासून नियमित परीक्षा सुरू होणार होती. तसेच उन्हाळी परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार होती. मात्र, अद्यापपर्यंत या परीक्षेबाबत विद्यापीठात कोणतीही हालचाल झालेली नाही. असे असतानाही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होत नसल्याने महाविद्यालये अडचणीत सापडली आहेत.
बनावट वेळापत्रकाचा सुळसुळाट
विद्यापीठाच्या परीक्षांसदर्भात परीक्षा विभागाकडून अद्यापही कुठल्या सूचना जाहीर झाल्या नसल्या तरी समाज माध्यमांवर बनावट वेळापत्रकाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांसमोर संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी खोट्या वेळापत्रकांवर विश्वास ठेवू नये, अशा सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.
परीक्षेची तयारी सुरू असून दोन ते तीन दिवसांमध्ये वेळापत्रक जाहीर केले जाईल. विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होणार नाही. वेळेत परीक्षा होतील. – डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग