भंडारा : जिल्ह्यात अतिवृष्टी होत असताना शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नसल्याने विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे वृत्त काही वेळापूर्वी लोकसत्ताने व्हायरल केले होते. या वृत्ताची अखेर प्रशासनाने दखल घेत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या पुर्व सुचनेनुसार भंडारा जिल्ह्यात दिनांक ८ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच आज भंडारा जिल्ह्यातील ४० पैकी ३८ मंडळात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली असून सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याव्दारे वर्तविण्यात आलेली आहे.
भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भंडारा जिल्ह्यात अनेक भागात अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावीत झाले असून जिल्ह्यातील १८ रस्ते हे पुरामुळे वाहतुकीस बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालये मधिल विद्यार्थाना आज आणि उद्या असे दोन दिवस सुट्टी देण्याचे जिल्हाधिकारी डॉ.संजय कोलते यांनी जाहीर केले आहे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना आज दिनांक ८ व उद्या ९ जुलै रोजी सुट्टी जाहिर करीत आहे.