बुलढाणा : राज्याच्या शैक्षणिक प्रगतीत महत्वाचा वाटा असतानाही राज्य शासन आणि प्रशासन यांच्या दुर्लक्षाचे बळी ठरलेल्या समग्र शिक्षा अभियान मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई स्थित आझाद मैदान येथे राज्यातील समग्र कर्मचाऱ्यांनी ठिय्या  दिला आहे. या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील ११० कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहे. समग्र शिक्षा अभियानातील सन २००२ पासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून त्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी समग्र शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी ४ मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे.

मुंबई येथे सुरू असलेल्या या कामबंद आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील ११० कर्मचारी सहभागी झाले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात एकूण २१० कर्मचारी काम करीत असून त्यापैकी अपंग समावेशित शिक्षण विभागातील काही कर्मचारी शासनाने सन २०२४ मध्ये निवडणुकीच्या आधी कायम केले. मात्र याच विभागातील एमए बीएड, एमएससी, नेट, सेट, पीएचडी धारक, असे कर्मचारी काम करतात.तसेच यामध्ये जिल्हा समन्वयक, कनिष्ठ अभियंता, लेखनिक, लिपिक, विषयतज्ञ, डाटा एन्ट्री ऑपरेटर, एमआयएस को ऑर्डिनेटर इत्यादी कर्मचारी काम करतात. या कायम न केलेल्या कर्मचाऱ्यांनी ४ मार्चपासून मुंबई येथे काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी अधिवेशनावर मोर्चा, आंदोलने, उपोषण करून २० वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे.आजपर्यंत शासनाकडून फक्त आश्वासन देण्यात आले.  आतापर्यंत शासनाने बराच रोजंदारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले आहे. ५० टक्के कर्मचाऱ्यांना कायम केले असून ५० टक्के कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत.यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा संपली असून शासनाने कायम करण्यासाठी नावापुरती समिती गठित केली आहे. परंतु, अजूनही एकही बैठक घेण्यात आले नाही.  शासनाने राज्यातील उर्वरित ५० टक्के कर्मचाऱ्यांना कायम करावे, यासाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांना कायम करावे किंवा इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आज बुलढाणा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.  बुलढाणा जिल्हाध्यक्ष रामेश्वर काळवाघे, सपकाळ आशिष वाघ, ईश्वर वाघ, प्रकाश कुलकर्णी यांनी निवेदन देऊन कर्मचाऱ्याच्या अडचणीकडे लक्ष वेधले .