गडचिरोली : जिल्ह्यात गडचिरोली आणि अहेरी मतदारसंघात महायुतीला वर्चस्व कायम ठेवण्यात यश आले. तर आरमोरीत भाजपच्या वर्चस्वाला धक्का देत काँग्रेसने यश संपादन केले. मतमोजणीच्या सुरवातीला अत्यंत चुरशीचा ठरलेला सामना शेवटी एकतर्फी झाल्याने गडचिरोलीत भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा आत्राम आणि आरमोरीत काँग्रेसचे रामदास मसराम विजयी झाले.

महायुतीमध्ये अहेरीत मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा सामना कन्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर) व भाजपचे बंडखोर पुतणे माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याशी झाला. ही लढत राज्यात लक्षवेधी होती. मात्र, तेथे धर्मरावबाबा आत्राम यांनी १८ हजारांहून अधिक मताधिक्क्याने विजय खेचूण आणत अहेरीवरील हुकूमत अबाधित ठेवण्यात यश मिळवले. दुसरीकडे गडचिरोलीत भाजप व काँग्रेसने नवे चेहरे मैदानात उतरवले होते. भाजपने विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना नाकारुन डॉ. मिलिंद नरोटे या नव्या तरुण उमेदवाराला संधी दिली होती. डॉ. नरोटे यांनी १४ हजारांहून अधिक मतांनी काँग्रेसच्या मनोहर पोरेटी यांना पराभवाची धूळ चारुन विजय नोंदवला. तर आरमोरीत भाजपने कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा संधी दिली. हॅटट्रिकच्या उंबरठ्यावरील गजबे यांचा सामना काँग्रेसच्या रामदास मसराम यांच्याशी झाला. नवख्या मसराम यांनी ५ हजार ७८२ इतक्या मतांनी पराभूत करुन गजबे यांच्या वर्चस्वाला जोरदार हादरा दिला.

हेही वाचा – सिंदखेडराजात माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंचा धक्कादायक पराभव; बुलढाण्यात संजय गायकवाड विजयी

महायुतीचे वर्चस्व

अहेरीत महायुतीचे उमेदवार मंत्री धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी अजित पवार गट) यांनी कन्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर) व पुतणे अम्ब्रीशराव आत्राम यांना पराभूत करुन गड शाबूत ठेवला. गडचिरोलीत नवख्या डॉ. मिलिंद नरोटे यांनी देखील जोरदार मुसंडी मारली, जिल्ह्यात महायुतीने वर्चस्व मिळवले असले तरी आरमोरीची जागा गमावली. तेथे काँग्रेसने विजय नोंदवून भाजपच्या दहा वर्षांपासूनच्या सत्तेला सुरुंग लावला.

हेही वाचा – वर्धा जिल्ह्यात चौफेर भगवा; देवळीत इतिहास, आर्वीत ओन्ली सुमित, वर्धा व हिंगणघाट येथे हॅटट्रिक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बंडखोर ठरले निष्प्रभ

आरमोरीत माजी आमदार आनंदराव गेडाम व डॉ. शिलू चिमूरकर यांनी बंडखोरी केली होती. मात्र, दोघांनाही अपेक्षित मतदान घेता आले नाही. डॉ. चिमूरकरांना एक हजारापर्यंतही मजल मारता आली नाही. आनंदराव गेडाम यांना जेमतेम १९१४ मते मिळाली. अहेरीत काँग्रेसचे हणमंतू मडावी आणि भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम देखील पिछाडीवर राहिले. आरमोरीत यामुळे काँग्रेसची व्होट बँक अबाधित राहिली व विजय सोपा झाला. भाजपला मात्र अतिआत्मविश्वास नडला.