गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून अहेरी विधानसभेतून मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अहेरीत आता पिता विरुद्ध पुत्री, अशी लढत होणार आहे. काही दिवसांपूर्वी भाग्यश्री यांनी वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात बंड करून शरद पवार गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून अहेरी विधानसभेतील राजकारणाची राज्यपातळीवर चर्चा होती. सोबतच काँग्रेसनेही या जागेवर आपला दावा कायम ठेवल्याने आघाडीत बिघाडीची चिन्हे निर्माण झाली आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून त्यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम शरद पवार गटाच्या संपर्कात होत्या. महिनाभरापूर्वी त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश केला. अहेरी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पारंपारिक दावा राहिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस आग्रही असताना देखील शरद पवार गटाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या ४५ उमेदवारांच्या यादीत भाग्यश्री आत्राम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अहेरीत ‘वडील विरुद्ध मुलगी’ असा थेट सामना होणार आहे. दरम्यान, भाजपकडून डावलण्यात आल्यानंतर मंत्री आत्राम यांचे पुतणे अम्ब्रीशराव आत्राम हे देखील शरद पवार गटाच्या संपर्कात होते. परंतु त्यांचे प्रयत्न कमी पडले. त्यामुळे ते आता अपक्ष लढतील अशी शक्यता आहे. अहेरीतील एकंदरीत राजकीय समिकरण बघता यंदा कधी नव्हे ते चार तुल्यबळ उमेदवार उभे राहणार आहे. त्यामुळे विजश्री खेचून आणण्यासाठी सर्वांचाच कस लागणार आहे.

हेही वाचा…दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची लूट! खासगी ट्रॅव्हल्सविरोधात तक्रारीसाठीचा क्रमांक बंद…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसही लढणार

महाविकास आघाडीकडून भाग्यश्री आत्राम यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसमध्ये असंतोष बघायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते विजय वाडेट्टीवार हे हणमंतू मडावी यांच्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे जागा वाटपाच्या बैठकीत वाडेट्टीवार यांनी अहेरीची जागा आम्ही लढवणारच यावर ठाम होते. गुरुवारी दिवसभर काँग्रेसच्या गोटात घडलेल्या घडामोडीनंतर हणमंतू मडावी देखील काँग्रेसकडून नामांकन दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१९ मध्ये देखील काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले. पुन्हा तीच पारिस्थिती उद्भवल्याने
महाविकास आघाडीत वाद पेटण्याची चिन्हे आहेत.