लोकसत्ता टीम

नागपूर : एअर होस्टेस प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीने वर्गातूनच प्रियकरासोबत पलायन केले. रात्री उशिरापर्यंत घरी न पोहचल्यामुळे तरुणीच्या आईवडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. वाठोडा पोलिसांनी तांत्रिक तपास करून तरुणीला पकडून पालकांच्या ताब्यात दिले आहे.

वाठोड्यात राहणारी १९ वर्षीय तरुणी मोना (काल्पनिक नाव) बी.एस्सी द्वितीय वर्षाला शिकते आणि हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्रात ती प्रशिक्षण घेते. तिचे वडिल वाहनचालक असून आईसुद्धा मोलमजुरी करते. एअर होस्टेस बनण्याची इच्छा होती. त्यामुळे तिच्या आईवडिलांना पै-पै गोळा केला. तिला हवाई सुंदरी प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळवून दिला. मोनाचे फेसबुकवरून वाडी परिसरात राहणारा युवक संजय याच्याशी सूत जुळले. संजय एका खासगी कंपनीत काम करतो. दोघांचे काही दिवस चॅटिंग सुरु होती. त्यानंतर दोघांनी फोनवरून संवाद साधत भेटी घेतल्या. गेल्या सहा महिन्यांपासून दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कुटुंबियांशी चर्चा करण्यास दोघेही घाबरले. त्यामुळे त्यांनी थेट पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा-‘टीसीएस’ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; परीक्षेत कॉपी पुरविल्याचा आरोप, खासगी कंपनीमार्फत पदभरतीवर प्रश्नचिन्ह

१० जानेवारीला मोना प्रशिक्षण केंद्रात जात असल्याचे सांगून बॅग घेऊन घराबाहेर पडली. सीताबर्डीत संजय हा दुचाकी घेऊन उभा होता. दोघेही दुचाकीने रामटेकेला गेले. तेथे एका नातेवाईकाच्या घरी मुक्कामी थांबले. दुसरीकडे मोना रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे चिंतेत सापडलेले आईवडिल वाठोडा पोलीस ठाण्यात पोहचले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ चव्हाण यांनी बाजू ऐकून घेतली. मिसींग पथकाचे प्रमुख पोलीस हवालदार नत्थूजी ढोबळे आणि विष्णू मेहर यांना तरुणीचा शोध घेण्यासाठी रवाना केले.

तांत्रिक तपासाने तरुणीचा शोध

वाठोडा पोलिसांनी तांत्रीक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर माहिती गोळा केली. त्यानंतर मैत्रिणींकडून माहिती घेतली. शेवटी सावनेर आणि रामटेके परिसरात शोध घेण्यात आला. त्यानंतर मोना आणि संजनाला पोलिसांनी ताब्यात घेतले. मोनाच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले.