राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक लोक राहतात आणि मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावं अशी मागणी करणाऱ्या कर्नाटकच्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. या वक्तव्यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दात निषेध करावा, अशी मागणी केली. तसेच याबाबत केंद्र सरकारला माहिती द्यावी, अशी सूचना शिंदे-फडणवीस सरकारला केली. ते बुधवारी (२८ डिसेंबर) नागपूर हिवाळी अधिवेशनात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “कालच (२७ डिसेंबर) आपण कर्नाटकचा निषेध करणारा आणि सीमावासीयांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा असल्याचा ठराव एकमताने मंजूर केला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री आणि नेते सातत्याने महाराष्ट्राच्या भावना दुखावण्याचं आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच पोहचवण्याचं काम करत आहेत. दुर्दैवाने त्यांना जशास तसं उत्तर दिलं जात नाही, म्हणून त्या लोकांची भीड चेपली गेलीय.”

“मुंबई केंद्रशासित प्रदेश करा, अशी कर्नाटक कायदामंत्र्यांची मागणी”

“कर्नाटक सरकारचे कायदामंत्री माधूस्वामी यांनी मुंबई केंद्रशासित प्रदेश करावी अशी मागणी त्यांच्या विधिमंडळात केली. तसेच मुंबईत २० टक्के कन्नड भाषिक राहतात असा जावईशोधही लावला. कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य लक्ष्मण सौदी यांनी तर मुंबई ही कर्नाटकचीच आहे असा दावा करून मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय,” असा आरोप अजित पवार यांनी केला.

हेही वाचा : Photos : नक्षलवाद्यांची धमकी ते शरद पवार मुख्यमंत्री असतानाची घटना, अजित पवारांची अधिवेशनातील महत्त्वाची वक्तव्ये

“महाराष्ट्रात कन्नड माणसं नाहीत का?”

अजित पवार पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात कन्नड माणसं नाहीत का? तर महाराष्ट्रात संपूर्ण भारतातील विविध प्रांतातील लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहतात. याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. आपण सर्वांना एकोप्याने घेतो. सीमाप्रश्नाला अशाप्रकारे चुकीचं वळण देण्याचं आणि सीमावासीयांच्या भावना दुखावण्याचं काम कर्नाटक सरकार करत आहे.”

“मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकचा तीव्र शब्दात निषेध करावा”

“माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, त्यांनी या दोन्ही वक्तव्यांचा तीव्र शब्दात निषेध करावा. कर्नाटक सरकार वारंवार असे वक्तव्य करत आहे. तसेच कर्नाटक असं वारंवार करत आहे हे केंद्र सरकारपर्यंत पोहचवावं. कारण स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बैठक घेऊन काही गोष्टी ठरवल्या होत्या,” असं अजित पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : “गोगावलेंनी शिवलेल्या सुटाला उंदीर लागतील, घरातली माणसं…”, अजित पवारांची अधिवेशनात जोरदार टोलेबाजी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“असे प्रकार पुन्हा खपवून घेणार नाही, अशी ताकीद द्या”

“कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त करावी. तसेच असे प्रकार पुन्हा खपवून घेणार नाही, अशी ताकीद करावी. मी या वक्तव्यांसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि कायदामंत्री यांचा तीव्र शब्दात निषेध करतो,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.