नागपूर : राज्यात अलीकडे झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी दिवाळी अंधारात घालवली, काहींनी तर आत्महत्याही केल्या. अशा संवेदनशील काळात नागपूरमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात “लावणी कार्यक्रमासह दिवाळी मिलन” साजरे झाले. यामुळे या पक्षावर “असंवेदनशीलतेची” टीका होत आहे.

सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या राजकीय पक्षाची किंवा या पक्षाच्या नेत्यांची लोकांच्या सुख-दुःखाशी नाळ जोडली पाहिजे, ही अपेक्षा असते. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या दु:खद स्थितीमुळे दिवाळी न साजरी करण्याचा निर्णय घेतला, ही बाब त्यांच्यातील “संवेदनशील नेतृत्व” दर्शवते. पण त्यांच्याच पक्षातून फूटून वेगळी चूल मांडणाऱ्या पण अजित पवार गटाच्या नागपूरमधील कार्यकर्त्यांनी अगदी उलट दिवाळी साजरी करून “राजकीय असंवेदनशीलता” प्रदर्शित केली, अशी टीका आता होऊ लागली आहे. सत्तेत आलेल्या गटांकडून “संवेदनशीलता” ही केवळ दिखाऊ ठरते, असा संदेश यामुळे जनतेपर्यंत गेला आहे.

एकीकडे शेतकऱ्यांच्या समस्या, दुसरीकडे ऐशआरामाचे कार्यक्रम असे पक्षाचे विरोधाभासाचे चित्र नागपूरमधून राज्यभर गेले आहे.. त्यामुळेच याची प्रदेश नेतृत्वाने गांभीर्याने दखल घेऊन कार्यक्रमाच्या आयोजकांना याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, राष्ट्रवादीची राजकीय ताकद नागपुरात जेमतेम आहे. पण आता या घटनेमुळे या पक्षाची पुरती शोभा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ग्रामीण भागात आहे हे लक्षात घेतल्यास, शेतकरी समाजात याचा नकारात्मक परिणाम संभवतो.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर ही बाब या पक्षासाठी अडचणीची ठरू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

प्रतिमा आणि वास्तवातील विसंगती

अजित पवार यांनी “गुलाबी रंग” आणि “लाडकी बहीण योजना” सारख्या उपक्रमांमधून महिलांचा सन्मान, नवा ब्रँड तयार करण्याचा प्रयत्न केला होता.पण नागपूरमधील कार्यक्रमात महिला कलाकारांकडून लावणी नृत्य करवून घेणे ही बाब त्यांच्या या प्रतिमेला धक्का देणारी ठरली आहे..

आम आदमी पार्टीची टीका

महाराष्ट्र आम आदमी पक्षाने या घटनेवर तीव्र टीका करत “स्त्री सन्मान” आणि “राजकीय नैतिकता” या विषयाला हात घातला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बारा वाजलेले असताना नागपूरच्या अजित पवार राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये ‘वाजले की बारा’ चा महिलाडान्स उद्विग्न करणारा आहे. प्रत्यक्षात त्यांचे कार्यकर्ते तसेच इतर प्रस्थापित पक्षांचे स्थानिक नेते कार्यकर्ते सुद्धा दहीहंडी सारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महिलांनाच नाचवताना दिसतात. त्यामुळे पक्षाच्या धोरणांमध्ये हा अनैतिक ढिसाळपणा, सवंग पुरुषी, सत्तेचा माज असल्याचा परिणाम नागपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दिसून आला.. या प्रस्थापित पक्षांनी स्वतःसाठी काही आचारसंहिता लागू करून घेण्याची गरज आहे. स्त्री सन्मानासंदर्भात कान उघडणी करण्याची गरज आहे. यावर किमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सजग महिला निषेध नोंदवतील अशी अपेक्षा आहे., अशी प्रतिक्रिया आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केली