अकोला : अकोल्यातील तरूणाने निर्माण केलेल्या ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या लघुपटाची जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. साहिल इंगळे असे या तरूणाचे नाव असून, ‘कान्स’साठी यंदा निवड झालेला हा देशातील एकमेव लघुपट आहे. अकोल्यातील तरुणाने निर्माण केलेला लघुपट आता थेट आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात सादरीकरण केले जाणार आहे. या निवडीमुळे अकोल्यासह संपूर्ण देशाच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.

केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत कोलकात्याच्या ‘सत्यजीत रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’मध्ये साहिल इंगळे ‘प्रोड्युसिंग फॉर फिल्म अँड टेलिव्हिजन’ या कोर्सचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. हा चित्रपट बंगाली भाषेबरोबरच युरोबा या नायजेरियाच्या भाषेत निर्माण करण्यात आला आहे. साहिल याची निर्मिती असून, इथोओपियाचा तरूण विद्यार्थी कोकोब गब्रवारिया टेस्फे याने दिग्दर्शन केले आहे.

तरुण फुटबॉलपटूची संघर्ष कथा

एक नायजेरियन तरुण खेळाडू भारतात फुटबॉलपटू म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी वडिलांची शेती विकतो. त्याचे स्वप्न पूर्ण होण्यात येणारे अडथळे व प्रयत्न यांची ही कहाणी आहे. चित्रीकरणासाठी केवळ इन्स्टिट्यूटची साधने वापरली. बाकी खर्च शून्य झाला. कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय हा चित्रपट पूर्ण झाला. इच्छा असेल तर अल्प साधनांतही चांगला चित्रपट निर्माण करता येतो, अशी प्रतिक्रिया साहिल याने व्यक्त केली. आपण आधी पुणे विद्यापीठातून जनसंज्ञापन विषयात पदवी घेतली आहे. जनसंज्ञापनात चित्रपटाची ताकद काय असते, याची जाणीव झाल्यावर आपण चित्रपट शिक्षणाकडे वळलो, असे देखील तो म्हणाला.

२७०० मधून केवळ १६ चित्रपटांची निवड

देशातील चित्रपट शिक्षण देणाऱ्या संस्थांकडून आलेल्या दोन हजार ७०० हून अधिक चित्रपटांतून केवळ १६ चित्रपटांची निवड झाली. लघुपट या श्रेणीत निवडला गेलेला आमचा देशातील एकमेव चित्रपट आहे, असे साहिल याने सांगितले. चित्रपट महोत्सवासाठी फ्रान्समध्ये जाण्यासाठी साहिल उद्या अकोला येथून रवाना होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कान्स चित्रपट महोत्सव हा फ्रान्स देशामध्ये भरतो. या उत्सवाचा प्रारंभ इ.स. १९३९ मध्ये झाला. हा जगातला एक महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे. येथे चित्रपट दाखला जाणे हे सन्माननीय आहे. अकोल्यातील तरुणाने निर्माण केलेला लघुपट थेट कान्स महोत्सवात पोहोचला आहे.