अकोला : लग्नाळू मुलांना मुलगी दाखवून रितसर लग्न केल्यावर सासरकडचे दागिने व पैशांवर हात साफ करणाऱ्या ‘लुटेरी दुल्हन’ प्रकरणाचा वाशीम जिल्ह्यातील रिसोड पोलिसांनी पर्दाफाश केला. या आंतरराज्य टोळीला रिसोड पोलिसांनी गजाआड केले आहे. रिसोड शहरात लग्नाच्या पहिल्याच दिवशी सहकाऱ्यांच्या मदतीने नववधूने दागिने, रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी तीन महिला आणि एका पुरुषाच्या टोळीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.

रिसोड पोलीस ठाण्यात १९ ऑगस्टला अजय नारायण भैराने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार १२ जुलै रोजी त्यांचे मामा प्रवासात असतांना एका महिलेसोबत लग्नसंदर्भात चर्चा झाली. त्या महिला आरोपी शारदा तनपुरे (रा.लोणार जि. बुलढाणा) हिने मुलगी दाखवण्याची तयारी दर्शवली. फिर्यादी उपवर व त्याच्या मामांशी वारंवार संपर्कात राहून लग्न जमवले. त्यानंतर २१ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता रिसोड येथील सातारकर महाराज संस्थान येथे लग्न लावून दिले. वराकडून रोख सव्वा लाख, सोन्या-चांदीचे ४४ हजार २०० रुपयांचे दागिने, ११ हजार ५०० रुपयांचे कपडे घेतले. लग्न झाल्यानंतर महिला आरोपी नववधू सोबत तिच्या सासरी गेली. मध्यरात्री घरातील सर्व झोपलेले असतांना दागिने व नगदी रोख रक्कम घेऊन नववधूसह आरोपी महिलेने पलायन केले. या प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

रिसोड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कौशल्यपूर्ण व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींची खरी नांवे निष्पन्न केली. लग्नामध्ये नवरी मुलीचे बनावट मामा म्हणून मंठा येथील श्रीरंग हिवाळे उपस्थित होते. या प्रकरणात शारदा भागाजी तनपुरे (वय ३५ वर्ष रा.टिटवी ता.लोणार जि. बुलढाणा) हिला लोणार येथून ताब्यात घेत चौकशी केली. प्राप्त माहितीवरून मनिषा सचिन आठवे (वय २८ वर्ष, रा.परभणी), पुजा कचरुलाल लिपत्रेवार (वय ४० वर्ष, रा.परभणी) यांना परभणी जिल्ह्यातून ताब्यात घेतले. लग्नात मामा बनून उपस्थित राहणारा श्रीरंग शाहुराव हिवाळे (वय ५४ वर्ष, रा. जालना) याला देखील ताब्यात घेतले. फसवणूक करून चाेरलेले सोन्या-चांदीचे दागिने आरोपींकडून जप्त केले आहेत.

अनेक ठिकाणी लग्नाच्या नावावर फसवणूक

लग्न फसवणूक प्रकरणाच्या अटकेतील टोळीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या टोळीने राज्यातील बीड, जालना, परभणी व मध्यप्रदेशमध्ये गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.