अकोला : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात आता अकोला ‘कनेक्शन’ समोर आले आहे. त्यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी फेसबुक पोस्ट शुबू लोणकर महाराष्ट्र या पानावरून शेयर केली. पोलिसांकडून आता त्याचा तपास केला जात आहे. शुबू हा अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील शुभम रामेश्वर लोणकर आहे का? या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबई येथे हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेमागे बिश्नोई गँगचा हात असल्याचे समाेर आले. या प्रकरणात ‘शुबू लोणकर महाराष्ट्र’ नामक फेसबुक पानावर पोस्ट शेयर करीत जबाबदारी स्वीकारली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रसारित पोस्टची सत्यता, या पोस्टच्या मागे कोण आहेत, याचा तपास आणि पडताळणी मुंबई पोलिसांकडून केली जात आहे.

हे ही वाचा…प्रवीण तोगडिया म्हणतात, ‘संघासोबत काही मुद्यावर मतभेद मात्र…’

शुबू आणि शुभम लोणकर एकच?, शस्त्र तस्करी प्रकरणात कारवाई

अकोट शहर पोलिसांनी १६ जानेवारी २०२४ रोजी दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान १० आरोपींना अटक केली होती. या १० आरोपींपैकी एक आरोपी शुभम रामेश्वर लोणकर मूळ गाव नेव्हरी बु. ता. अकोट हा होता. शुभम लोणकरला ३० जानेवारी २०२४ रोजी वारजे नगर पुणे येथून अटक केली होती. तपासानंतर जामिनावर त्याची सुटका झाली. दरम्यान, काल रात्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्याची माहिती मिळताच अकोट पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी १० पैकी आठ आरोपींना अकोट व अंजनगाव सुर्जी येथून ताब्यात घेतले. दोन आरोपी शुभम लोणकर व त्याचा भाऊ प्रवीण लोणकर यांचे घरी तपासणी केली असता दोघेही आढळून आले नाहीत. ते दोघेही जून महिन्यापासून अकोट सोडून गेल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. गुन्ह्यासंबंधी अकोला पोलीस मुंबई गुन्हे शाखेसोबत संपर्कात असून त्यांना सहकार्य करीत आहे, अशी माहिती अकोटचे सहायक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल यांनी दिली.

हे ही वाचा…काँग्रेसमधून निलंबित आमदार सुलभा खोडके लवकरच भूमिका जाहीर करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गँगस्टर बिश्नोईच्या संपर्कात

गँगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात शुभम लोणकर होता. त्या दोघांच्या संपर्काच्या अनेक चित्रफित पोलिसांच्या हाती लागल्या होत्या. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी वर्तुळाशी त्याचा चांगला संपर्क असल्याचे समोर आले होते. आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर फेसबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर आणि शुभम लोणकर हा एकच आहे का? हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, असे अकोला पोलिसांचे म्हणणे आहे.