अकोला : दारुच्या नशेत पोलीस उपनिरीक्षकाने दहिहांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात गोंधळ घालून वैद्यकीय अधिकाऱ्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. पोलीस उपनिरीक्षक तेवढ्यावरच न थांबता त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्याला गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची धमकी सुद्धा दिली. या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली. डॉ. सागर कळसकर असे तक्रारकर्त्या डॉक्टरचे नाव असून पोलीस उपनिरीक्षक गडलिंगे यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या घटनेची चित्रफित समाजमाध्यमातून प्रचंड प्रसारित झाली आहे.

दहिहांडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सन २०२३ पासून वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. कससकर कार्यरत आहेत. २५ मे रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात ते कर्तव्यावर असतांना सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दहिहांडा पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रभुदास गडलिंगे वर्दीमध्ये केंद्राच्या परिसरात येऊन गोंधळ घातला. त्यांच्या जवळ जाऊन विचारणा केली असता त्यांनी केंद्र बंद आहे का? असा प्रश्न केला. रविवार असल्याने ओपीडी बंद आहे. अत्यावश्यक सेवा सुरू असतात, असे सांगितले. त्यावर पोलीस उपनिरीक्षकांनी ‘तू इकडे हजर राहत नसतो. मी तुझी तक्रार करतो व तुला निलंबित करतो, न्यायाधीश माझे नातेवाईक आहेत. गुन्हा दाखल करतो. मी वर्ग दोनचा अधिकारी आहे.’ असे म्हणून प्रचंड शिवीगाळ केली. त्यानंतर ते दुचाकीने निघून गेले. ही संपूर्ण घटना भ्रमणध्वनीतद्वारे चित्रित करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षकांनी दारुच्या नशेत प्रचंड शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रारीत केला आहे. या घटनेची माहिती ठाणेदार ठाकरे यांना सुद्धा देण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक गडलिंगे यांनी काहीही कारण नसतांना दारुच्या नशेत दहिहांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन केले. गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची धमकी सुद्धा दिली. या प्रकरणी योग्य दखल घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी डॉ. सागर कळसकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, दमदाटी व शिवीगाळ करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कठोर कारवाईची मागणी आता डॉक्टरांकडून होत आहे. या प्रकरणात आता वरिष्ठ अधिकारी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. डॉक्टर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस उपनिरीक्षकाच्या कृतीने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.