अकोला : मुसळधार पावसाने जिल्ह्याला शनिवारी अक्षरश: झोडपून काढले आहे. जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला असून सर्वत्र जलमय परिसर झाला. दिवाळी होताच जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस दाखल झाला. या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाले आहेत.

मोसमी पाऊस परतल्याने वातावरणात कोरडेपणा आला होता. दिवसा ऊन आणि रात्री गारवा जाणवत होता. हलक्या पावसाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. ऐन दिवाळीच्या उत्साहात अकोला जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वातावरण सामान्य असतांना अचानक वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी कोसळल्या. जिल्ह्यातील विविध भागात हा पाऊस झाला. बहुतांश भागात हलक्या व काही भागात मध्यम स्वरूपात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. त्यानंतर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास सुमारे अर्धा तास चांगलाच पाऊस झाला. हवामान विभागाने शनिवारी जिल्ह्यात हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. दिवसभर ऊन व पावसाचा खेळ सुरू होता. पावसाच्या सरी व काही वेळात ऊन असे चित्र असतांनाच सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक तासांपर्यंत जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचले आहे. शहरातील काही भागांमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरले. नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आले आहे. पावसाचा परिणाम वीज पुरवठ्यावर देखील होऊन खंडित झाला होता. मुसळधार पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. आणखी काही दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

अकोला जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी उत्पादन काढले असून अनेकांनी ते विक्रीसाठी बाजारपेठेत आणले. पावसामुळे उत्पादित तो माल भिजून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसल्याचे चित्र आहे. अगोदरच सोयाबीनला भाव नाही. त्यातच पावसामुळे मालावर आणखी विपरित परिणाम होत आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर देखील पावसाचे संकट कोसळले. खरीप हंगामातील कापूस काढण्याच्या स्थितीत आहे. अनेक शेतकऱ्यांकडून काढणी सुरू असतांनाच मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे कापूस पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगामी रब्बी हंगामासाठी मात्र हा पाऊस पोषक मानला जात आहे.