अकोला : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरुन सरकारला घेणाऱ्या बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या अकोला जिल्हाध्यक्षांनी शेकडो शेतकऱ्यांचा सातबारा वापरुन हमीभावावर ज्वारी खरेदीचा घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्वारी खरेदीत फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधान परिषदेत केला.
त्यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. एकीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बच्चू कडू रस्त्यावर उतरले असतांना दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या नावावर फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.
अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्वारी खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी बनावट व्यवहार झाल्याची चर्चा आहे. या घोटाळ्यात संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे नाव समोर आले. या संस्थेचे प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू हे अध्यक्ष आहेत. ज्वारी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वंचितचे नेते निखिल गावंडे यांनी केली होती.
बाजार समितीने नोडल एजन्सी म्हणून तालुका खरेदी-विक्री संघ आणि कुलदीप वसू यांच्या अध्यक्षतेखालील संत नरसिंग महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची नेमणूक केली होती. यात संत श्री नरसिंग महाराज फार्मर्स प्रोडूसर कंपनीकडे सुमारे एक हजार १०० शेतकऱ्यांनी, तर खरेदी-विक्री संघाकडे एक हजार २०० च्या जवळपास शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केली होती. वसू यांच्या कंपनीच्या माध्यमातून सुमारे १८० शेतकऱ्यांच्या नावाने बोगस ज्वारी खरेदी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अकोट तालुक्यातील जळगाव नहाटेच्या रामेश्वर साबळे यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली.
त्यांचा क्रमांक लवकर न लागल्यामुळे त्यांना आपली ज्वारी कमी भावात व्यापाऱ्यांना विकावी लागली होती. ३५०० रुपयांचा हमीभाव त्यांना मिळाला नाही. चक्क ज्या शेतकऱ्यांनी ज्वारीचा पेराच केला नाही, त्या शेतकऱ्यांचा सात-बारा ज्वारी घोटाळ्यात वापरण्यात आला. पेरे पत्रकावर खोडतोड करून ज्वारीचा ज्वारीचा उल्लेख करून हा प्रकार करण्यात आला.
ज्वारी पिकवलेल्या शेतकऱ्यांकडून कमी भावात ज्वारी खरेदी करून तिच ज्वारी शासनाला ३५०० या हमीभावाने विक्री केल्याचा आरोपी देखील करण्यात आला आहे. हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात उपस्थित झाल्यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे. चौकशीतून नेमकं सत्य समोर येण्याचा अंदाज आहे.