अकोला : विकृतीने सीमा गाठल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २७ वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार अकोला जिल्ह्याच्या बाळापुर तालुक्यातील निंबी गावात घडला. शुभम उत्तम वानखडे (रा.निंबी, ता. बाळापूर, जि. अकोला) असे नराधम आरोपीचे नाव आहे. उरळ पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला गजाआड केले. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
वरिष्ठ महिला अधिकारी व विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणाच्या काही तासांनंतरच तरुणाने अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या सर्व प्रकारामुळे अकोला जिल्ह्यात नेमकं चालले तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला. या घटनांमुळे जनमानसात संतापाची लाट पसरली असून आरोपी विरुद्ध तीव्र रोशाची भावना निर्माण झाली आहे.
अकोला जिल्ह्यात एका मागून एक घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमुळे मोठी खळबळ उडाली. न्यायालयातील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा एका वकिलाने मानसिक छळ करून विनयभंग केल्याचा प्रकार घडला. त्यानंतर जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत जिल्हा परिषद शाळेतील चौथ्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा तिच्याच वर्गमित्राच्या वडिलाने नको तो स्पर्श करून विनयभंग केला. या दोन्ही घटना ताज्या असतानाच एक विकृत प्रकार बाळापुर तालुक्यातून समोर आला आहे.
निंबी गावात १७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आरोपी शुभम वानखडे याच्या निवासस्थानी पीडित अल्पवयीन मुलाचे पालक आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा देखील होता. यावेळी परिसरातच दोन लहान भावंड खेळत होते. आरोपीने पीडित मुलाच्या भावाला पाणी आणण्यासाठी घरात पाठवले. त्यानंतर पीडित मुलाला एकट्याने गाठून त्याच्यावर अनैसर्गिकपणे लैंगिक अत्याचाराचा विकृतपणा केला.
पीडित मुलाने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांना मोठा धक्का बसला. त्यातून सावरत पालकांनी पीडित मुलासह थेट उरळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपी शुभम वानखडे याच्याविरुद्ध कलम ३, ४, ५, ६, ९ आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शुभम वानखडे याला शुक्रवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास उरळ पोलीस करीत आहेत.