अकोला : कापसाचे अतिरिक्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांचा फरदड घेण्याकडे कल असतो. मात्र, फरदडमुळे पुढील हंगामात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी फरदड निर्मूलन करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जनजागृती कृषी विभागाकडून केली जात आहे.

चालू वर्षी खरीप हंगामात पेरणी उशिरा झाल्याने सध्या कापूस पीक हंगाम अंतिम टप्प्यात आहे. अतिरिक्त उत्पादनासाठी काही ठिकाणी कापसाची फरदड घेण्याची शक्यता आहे. फरदडीमुळे गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र वर्षभर सुरू राहते. त्याचबरोबर, जिनिंग व प्रेसिंग मिल, गोदामे, मार्केट यार्ड याठिकाणी कच्च्या कापसाची दीर्घ काळासाठी साठवणूक केली जाते.

हेही वाचा…येणाऱ्या काळात वर्धा जिल्हा स्वदेशीचे तीर्थक्षेत्र

या कापसामध्ये राहिलेल्या गुलाबी बोंडअळीच्या अवस्थेनंतर घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या पिकासाठी स्रोतस्थान म्हणून काम करतात. किडीस निरंतर खाद्य मिळत राहिल्याने पुढील हंगामात किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उपाययोजना म्हणून फरदड निर्मूलन करणे हा कपाशी पिकामध्ये महत्त्वाचा भाग असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

फरदडपासून मिळणारे उत्पन हे साधारणत: डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत घेतले जाते. हा कालावधी गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी पोषक असून प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. कापूस पिकात खोडवा किंवा फरदड पीक घेतल्यास अळीचे जीवनचक्र कायम राहून प्रादुर्भाव पुढील वर्षाच्या हंगामात वाढण्याची शक्यता अधिक असते.

हेही वाचा…परिवहन खात्याचा ‘रस्ता सुरक्षा अभियान’बाबत गोंधळ!

त्यामुळे कापसाची तिसरी वेचणी झाल्यानंतर डिसेंबर ते जानेवारी महिन्यानंतर शेतातून कापूस पीक काढून घ्यावे. पऱ्हाट्याचा शेतात ढीग रचून ठेवू नये. त्यामुळे बोंडअळी ढिगाखाली कोषावस्थेत जाऊन लपू शकते.

काढलेल्या पऱ्हाट्याचे कंपोस्ट खत बनवण्यावर भर देण्यात यावा. गुराढोरांनी चरल्यानंतर कापूस श्रेडर यंत्राने उभे कापसाचे पीक जमिनीत तुकडे करून दाबून टाकावे. गाडलेल्या ठिकाणी स्प्रिंकलरने सौम्य पाणी देऊन त्यावर कचरा करण्यासाठी ट्रायकोडर्मा द्रावणाची फवारणी करावी, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले.

हेही वाचा…वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवसांत तिसरा बळी

तर ७० टक्के अळीचे नियंत्रण

कापसाची शेवटची वेचणी झाल्यानंतर चरण्यासाठी बकऱ्या, गाय व इतर ढोरे सोडावेत. जनावरांनी प्रादुर्भाव युक्त बोंडे खाल्ल्यामुळे ७० टक्क्यांपर्यंत बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करून पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी कापूस पिकाच्या फरदडीचे निर्मूलन करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. -शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.