अकोला : आलिशान कारमधून गोवंशाची तस्करी केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अतिशय शिताफीने गोवंश चोरणाऱ्या टोळीला गजाआड केले. ११ गुन्ह्यांचा उलगडा झाला असून पोलिसांनी १६ लाख ९७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.कौलखेड येथून २८ सप्टेंबरला पहाटे एक गोवंश चोरी करून कारमधून नेत असल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.
बाळापूर पोलीस ठाण्यांतर्गत व्याळा येथून गाय पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये टाकून अज्ञात चोरटे पसार झाले होते. गोवंश चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांना गोवंश चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे सूचित केले. यासाठी पथक गठीत केले. पथकाने गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणावरून आरोपी मुंबईचे असल्याचे निष्पन्न झाले. ते राजस्थानमधील अजमेर येथे असल्याची माहिती मिळाली. ते अजमेर येथून इंदौर मार्गे अकोल्याकडे येत असल्याचे कळल्यावर मुक्ताईनगर येथील बसस्थानक येथे सापळा रचण्यात आला.
आरोपी शेख रेहान शेख रशीद, मिर्झा शोएब बेग मिर्झा अजहर बेग, शेख समीर शेख शब्बीर, अरबाज खान फिरोज खान यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचे आणखी साथीदार आरोपी नुरेश खान बहाद्दार खान, शेख अयुब शेख ईल्यास, शोएब खान शब्बीर खान यांना देखील अकोल्यातून अटक केली. गोवंश चोरणाऱ्या या टोळीने अकोला जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल ११ गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून रोख एक लाख ५२ हजार, तीन मोबाइल, गोवंश चोरीसाठी वापरण्यात आलेल्या तीन कार असा एकूण १६ लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींवर अगोदर देखील या स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. गोपाल ढोले, विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. माजीद पठाण, विष्णू बोडखे आदींच्या पथकाने केली.
पोलीस अधीक्षकांकडून कौतुकाची थाप
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करून गोवंश चोरणाऱ्या टोळीला गजाआड केल्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले. पथकासाठी त्यांनी १५ हजारांचे बक्षीस जाहीर केले.