अकोला : आमदार सुरेश धस यांचा सीडीआर काढण्याची आवश्यकता असून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोन दिवसांपूर्वीपर्यंत सुरेश धस वाल्मीक कराडच्या संपर्कात होते, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज येथे केला आहे.

अकोल्यात ते पत्रकारांशी बोलत होते. मस्साजोग प्रकरणातून लक्ष विचलित करण्यासाठी धनंजय मुंडेंवर आरोप होत आहे. बीडच्या अनेकांना मुंडे यांना बाजूला करायचे आहे. संतोष देशमुख हत्येच्या दोन दिवस अगोदरपर्यंत धस हे कराडच्या संपर्कात होते. त्यामुळे धस यांची देखील चौकशी व्हावी, अशी मागणी मिटकरी यांनी केली. धस यांच्या विरोधातील अनेक प्रकरणाचे पुरावे योग्यवेळी आपण बाहेर काढू, जानेवारी २००१ साली पथर्डी तालुक्यात एका गावात दरोडा पडला होता. त्या दरोड्याच्या म्होरक्याचे संबंध कोणासोबत होते हेसुद्धा समोर आणले जातील, असा इशारा देखील त्यांनी दिला.

हेही वाचा – आकलन क्षमता कमी असलेल्या महिलेला आई होण्याचा अधिकार नाही का ? उच्च न्यायालयाचा प्रश्न

खंडणी, जमिनी बळकावणे यांच्यासारखे गंभीर गुन्हे धस यांच्यावर दाखल आहेत. दरोडा टाकणारी दारासिंग ऊर्फ मारुती भोसले गँगच्या अंगावर सुरेश धस मित्रमंडळ, असे टी शर्ट होते. ही भोसले गँग कोणाचाही काटा काढू शकते, हा नेता कोण ते सगळ्यांना माहिती आहे, असे मिटकरी म्हणाले.

सुरेश धस यांनीच बीडमध्ये हुकूमत तयार केली. इतिहासात तेच ‘आका’ होते. मी त्यांच्यावर आरोप केले की, मला थेट हत्येच्या धमक्या येत आहे. धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावणे आरोपांची मोठी यादी आहे. निवडणूक निकालानंतर पालकमंत्रिपद आपणास मिळेल, असे धस यांना वाटले होते, पण ते मिळत नसल्याने धनंजय मुंडे यांना बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मिटकरी म्हणाले.

हेही वाचा – मुंबई : सलग दुसऱ्या दिवशी शिवाजीनगरची हवा ‘वाईट’, परिसरावार मॉनिटरिंग व्हॅनची नजर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्ष धनंजय मुंडेंच्या पाठीशी

धनंजय मुंडे यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष खंबीरपणे उभा आहे. आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. संतोष देशमुख यांच्या हत्येचे कोणीही समर्थन करीत नाही. धनंजय मुंडे यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली. आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. धनंजय मुंडे यांना राजकीय द्वेषातून लक्ष्य केले जात असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.