अकोला : चाकूच्या धाकावर एका अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीवर आरोपीने बळजबरी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना शहरातील डाबकी रोड परिसरात घडली आहे. या प्रकरणात डाबकी रोड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली.

जुने शहरातील संतप्त नागरिक रविवारी रात्री शासकीय विश्रामगृहावर एकत्रित जमले होते. यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढून आरोपीला तत्काळ अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा केली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

शहरातील डाबकी रोड परिसरातील रहिवासी एक कुटुंबीय गणपती विसर्जनासाठी बाहेर गेले होते. यावेळी घरात एकटीच सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी होती. आरोपीने त्याचा फायदा घेत तो मुलीच्या घरात शिरला. चाकूचा धाक दाखवून २४ वर्षीय आरोपी तौहीद खान समीर खान याने बलात्कार केला. यावेळी पीडित मुलीने एकच आक्रोश केला. पीडित मुलीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक एकत्रित जमले होते. मात्र, आरोपीने त्यांना देखील चाकूचा धाक दाखवून घटनास्थळावरून फरार झाला.

पीडित मुलीचे आई-वडील घरी आल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. पालकांनी पीडित मुलीला घेऊन डाबकी रोड पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके गठीत करण्यात आले असून ते रवाना झाले आहेत. आरोपींनी यापूर्वी देखील अनेक पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हे केले आहेत. दरम्यान, आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली. या प्रकरणात जुने शहरातील नागरिक देखील संतप्त झाले असून रविवारी रात्री ते सर्व शासकीय विश्रामगृहावर एकत्रित जमले. यावेळी आ. रणधीर सावरकर यांनी संतप्त नागरिकांसोबत संवाद साधला.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना होणार नाही, यासंदर्भात दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी पोलिसांना केल्या आहेत. शांततेची परंपरा कायम राखण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करेल, आरोपीला पाठीशी घालणार नसल्याचे आ.सावरकर यांनी नागरिकांना सांगितले. यावेळी विजय अग्रवाल, जयंत मसने आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.