अकोला : शहरातील नवीन बसस्थानक चौकातील भुयारी मार्ग हा अत्यंत धोकादायक ठरत आहे. या भुयारी मार्गातून पाणी जाण्यास जागाच नसल्याने पावसाचे पाणी सुमारे २५ फुटापर्यंत साचले. भुयारी मार्गावरील पाण्यात बुडून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली. या भुयारी मार्गामुळे एकाचा बळी गेल्याने त्याला जबाबदार कोण? हा भुयारी मार्ग की तलाव? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
अकोला शहरातील नवीन बसस्थानक चौकात उडाणपुलाच्या खालून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. टॉवर चौकातून प्रमिलाताई ओक सभागृहाजवळ हा मार्ग जोडल्या जातो. या भुयारी मार्गाचे निर्माण उड्डाणपुलासोबतच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आले. निर्माण कार्य पूर्ण झाल्यानंतर हा भुयारी मार्ग अकोला महापालिकेकडे हस्तांतरित केला.
या भुयारी मार्गामध्ये अनेक तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे तो निरुपयोगी ठरतो. या भुयारी मार्गात नेहमीच मोठ्या प्रमाणात पाणी साचते. परिणामी, वाहतुकीसाठी तो कायमच बंद असतो. पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही व्यवस्था भुयारी मार्गात करण्यात आलेले नाही. अनेकवेळा साचलेले पाणी पंपाद्वारे काढावे लागते.
गेल्या काही दिवसांपासून शहरात पाऊस पडत आहे. या पावसाचे सुमारे २५ फूट पाणी भुयारी मार्गात साचले. दरम्यान, या पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. भुयारी मार्गातील पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला.
नागरिकांनी याची माहिती शहर कोतवाली पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलीस कर्मचारी सोपान डाबेराव यांनी स्वत: पाण्यात उडी घेऊन नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
भाजपचे अधिकाऱ्यांच्या डोक्यावर खापर
भुयारी मार्गात एकाचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या माजी नगरसेवकाने सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. हा भुयारी मार्ग तयार करणाऱ्या कंपनीसह संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, वारंवार तक्रारी केल्यावरही अधिकारी झोपेचे सोंग घेत असून भुयारी मार्गाच्या समस्यावर उपाययोजना करीत नसल्याचा आरोप भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी केला आहे. या गंभीर समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी विजय अग्रवाल यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.