बुलढाणा : भाजप कार्यकर्ते पंकज देशमुख यांची आत्महत्या नव्हे तर घातपातच असल्याचा गंभीर आरोप जळगाव मतदारसंघातील सर्वपक्षीय न्याय हक्क जन आंदोलन समितीने केला. हा सर्व घटनाक्रम आणि पोलिसांची भूमिका, तपास संशयांस्पद असून या घटनेची ‘सीआयडी’मार्फत चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
सत्ताधारी, विरोधी अशा सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश असलेल्या न्याय हक्क जन आंदोलन समितीने आज, मंगळवारी याप्रकरणी जिल्हाधिकारी किरण पाटील यांची भेट घेऊन त्यांना न्यायासाठी साकडे घालत निवेदन दिले. यानंतर स्थानिय शासकीय विश्रामगृहात प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला.
यावेळी दिवं. पंकज देशमुख यांच्या विधवा पत्नी व त्यांची दोन मुले, सुनीता देशमुख, त्यांचे बंधू गजानन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा सहकार नेते ॲड. प्रसेनजित पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जळगाव विधानसभा अध्यक्ष रंगराव देशमुख, काँग्रेस नेत्या स्वाती वाकेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय पोहनकर, अभय मारोडे, मनोज वाघ, शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा प्रमुख अजय पारस्कर, ज्येष्ठ आंबेडकरी नेते भाऊ भोजने, शिवसेना उबाठाचे विधानसभा संघटक भीमराव पाटील, समाजवादी पार्टीचे सैय्यद नफिज, वंचित बहुजन आघाडीचे रमेश नाईक, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विश्वास पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी सुनीता देशमुख यांनी आपले पती पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून घातपात असल्याचा स्पष्ट आरोप केला. माझे पती आत्महत्या इकरण्याइतपत कमकुवत नव्हते. भाजपमधील काही कार्यकर्त्यांनी आपणास न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले, पण ते पाळले नाही. त्यांनी विश्वासभंग केला. त्यामुळे मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे न्यायासाठी साकडे घातले. मात्र न्याय मिळाला नाही. अजित पवारांमुळे वरिष्ठ स्तरावर काही हालचाल झाली, पण जळगाव पोलीस मात्र ढिम्मच असल्याचे त्या म्हणाल्या. आपणास पतीचा मृतदेहदेखील उशिरा दाखवण्यात आला. शवविच्छेदन जळगावऐवजी अकोला येथे करण्यात आले. यामुळे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून आपणास न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
सुनीता देशमुख यांचे भाऊ गजानन देशमुख यांनी जळगाव पोलिसांवर आमचा विश्वास नसल्याचे सांगून ते नुसता वेळकाढूपणा करीत असल्याचा आरोप केला. ॲड. प्रसेनजित पाटील आणि स्वाती वाकेकर यांनी यावेळी सांगितले की, ही आत्महत्या नव्हे तर हत्याच आहे. आत्महत्येचा बनाव करण्यात आला. मात्र, गळ्याला लागलेला नाममात्र फास, पंकज देशमुख यांच्या अंगावरील वळ, मारहाणीच्या जखमा, त्यांचे जमिनीवर असलेले पाय, यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. पोलीस आत्महत्या सांगून मोकळे झाले. यामुळे आम्ही सर्वपक्षीय नेते देशमुख परिवाराला न्याय देण्यासाठी एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले. बीडमधील ‘आका’पेक्षा जळगावमधील आका मोठा असल्याचे ॲड. पाटील यांनी सांगून पत्रकार परिषदेत खळबळ उडवून दिली. प्रारंभी विजय पोहनकर यांनी ३ मे रोजीच्या कथित आत्महत्येपासून आजवरचा घटनाक्रम विषद केला. यावेळी रंगराव देशमुख व अन्य नेत्यांनी विविध पैलूंवर प्रकाश टाकला.
आमदार आवाज उठवणार
याप्रकरणी विविध पक्षीय आमदार विधिमंडळात आवाज उठवणार असल्याचे सांगण्यात आले. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड, विधानपरिषद सदस्य धीरज लिंगाडे, ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात, समाजवादीचे अबू आजमी यांचा यात समावेश आहे. प्रसंगी न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगून ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांच्याशी चर्चा झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.