अकोला : शहरातील एका उच्चभ्रू वस्तीमध्ये बंद सदनिकेत भिन्न धर्मीय तरुण व तरुणी आढळून आले. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून तरुणाविरोधात लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नोवेल अली नवाब अली (१९, रा.मूर्तिजापूर) असे आरोपीचे नाव आहे.

जठारपेठ येथील अपार्टमेंटमधील एका बंद सदनिकेत तरुण व तरुणी गेले होते. त्या सदनिकेतून मुलीच्या ओरडण्याचा आवाज स्थानिकांना ऐकू आला. परिसरातील नागरिकांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना दिली. त्या कार्यकर्त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सिव्हिल लाईन पोलिसांना अवगत केले.

बजरंग दल, विहिंपचे कार्यकर्ते पोलिसांना घेऊन त्या सदनिकेमध्ये दाखल झाले. त्यावेळी बाहेरुन कुलूप लावले होते. ते कुलूप खोलण्यात आल्यावर त्या सदनिकेमध्ये भिन्न धर्मीय तरुण व तरुणी आढळून आले. दोघांनाही सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांची प्राथमिक चौकशी केली. या प्रकरणात तरुणीने आरोपीविरोधात लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली. सिव्हिल लाईन पोलिसांनी आरोपी तरुणाविरोधात बीएनएस ७५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पालकांनी पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज

अकोला शहर हे शैक्षणिक हब म्हणून समोर आले आहे. शहरात खासगी शिकवणी वर्गाचे जाळे निर्माण झाले. पालक वर्ग आपले पाल्य उच्च शिक्षण घेऊन मोठे होतील, हे स्वप्न उराशी बाळगून त्यांना शिक्षणासाठी अकोल्यात पाठवतात. अनेक जिल्ह्यातील विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येत असतात. मात्र, ते विद्यार्थी खरंच शिक्षण घेतात की शिक्षणाच्या नावाने इतर प्रकार करतात?, मोबाइलचा वापर कसा करतात? याकडे पालकांनी विशेष लक्ष देण्याची खरी गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवळ महाविद्यालयात दाखल करून किंवा शिकवणी लावून पालकांची जबाबदारी संपत नाही. पाल्यांना विश्वासात घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, ‘लव्ह जिहाद’चे प्रकार शहरात वाढत आहेत. पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे.