नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दीड दिवसांचा नागपूर दौऱ्यावर आले असून त्यांनी रविवारी रात्री स्थानिक नेत्यांसोबत खलबते झाल्याची माहिती आहे. शहा  रविवारी रात्री नऊ वाजता नागपुरात आले आणि सोमवारी दोन कार्यक्रम  करून ते नांदेडकडे रवाना झाले.अमित शहा यांच्या नागपूर दौऱ्यादरम्यान अनेक राजकीय पैलूंवर चर्चा झाल्याचे समजते. राज्यातील राजकीय घडामोडीवर तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल चळवळीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. शहा राज्यमंत्रिमंडळाच्या कामगिरीबाबत समाधानी असून भाजपच्या कोट्यावतील मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरण्यात येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष आग्रहामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाले. भुजबळ यांचा अलिकडे मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. त्याप्रमाणे भाजपमधून पुन्हा एका नेत्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. विदर्भातील भाजपचे अनुभवी नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री म्हणून केलेली कामगिरी आणि त्यांचे सामाजिक कार्य बघता त्यांना संधी मिळावी, यासाठी भाजपचे काही नेते आग्रही असल्याचे समजते.

भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नवी उंची दिली आहे. त्यांनी राज्याचे अर्थमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष, वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्रीपदावर असताना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून आपला ठसा उमटविला आहे. चंद्रपूर जिल्हाच्या विकासाला त्यांनी वेगळी उंची मिळवून दिली. येथील जनतेने त्यांना लोकनेते, विकासपुरूष अशी उपाधी बहाल केली.  पण, त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाली नव्हती. आता पुन्हा त्यांच्या मंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. त्याला कारण तसेच ठरले आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादीच्या कोट्यातून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. भुजबळांना देऊन भाजपने ओबीसी समाजाला खूश करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

 त्याचप्रमाणे भाजपच्या कोट्यातील एक मंत्रिपद शिल्लक आहे. त्यासाठी ठिकाणी भाजपच्या एका नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमित शहा यांच्या दीड दिवसांचा दौरा आणि रात्री झालेले राजकीय खलबते यामुळे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळेल, याकडे लक्ष लागले आहे. तर भुजबळाप्रमाणे ज्येष्ठ मुनगंटीवार यांची सन्मानाने मंत्रिमंडळात वापसी होण्याबद्दल त्यांच्या समर्थक प्रचंड आशावादी आहेत.