अमरावती : भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना हैदराबादमधील एका व्यक्तीकडून स्पीड पोस्टद्वारे अत्यंत गंभीर स्वरूपाची धमकी देण्यात आली आहे.जावेद नावाच्या व्यक्तीने पाठवलेल्या या पत्रात, ‘माझ्याकडे ५० जणांची टोळी (गँग) आहे, तुझ्यावर गँगरेप करून मारून टाकू,’ अशा भयंकर व आक्षेपार्ह शब्दांत धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात तत्काळ गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलीस यंत्रणेने तपास सुरू केला आहे.

निवासस्थानी आले धमकीचे पत्र

मिळालेल्या माहितीनुसार, हे धमकीचे पत्र स्पीड पोस्टच्या माध्यमातून नवनीत राणा यांच्या अमरावती येथील निवासस्थानाच्या पत्त्यावर आले आहे. पत्रात अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरण्यात आली आहे. अशा धमक्या मिळण्याची नवनीत राणा यांची ही पहिली वेळ नाही; यापूर्वीही त्यांना अनेकदा धमक्या आल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेबद्दल वारंवार चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

पोलीस यंत्रणेची कसून तपासणी

या गंभीर घटनेनंतर नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक मंगेश कोकाटे यांनी तातडीने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. राजापेठ पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पत्रावरचा पत्ता आणि ‘पोस्टमार्क’ तपासले जात आहेत. स्पीड पोस्ट असल्याने, पोस्टल ट्रेसिंग, पोस्टमास्टरच्या नोंदी आणि संबंधित पोस्ट ऑफिसच्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पाठवणाऱ्याचा शोध घेतला जाईल. तसेच, पत्रातील शाई (इंक), हस्ताक्षर आणि कागद यांचे न्यायवैद्यक (फोरन्सिक) विश्लेषण करण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, सध्या हा गुन्हा धमकी व भडकावणाऱ्या पत्रव्यवहाराचा प्रकार म्हणून नोंदवण्यात आला आहे. तपासादरम्यान आरोपीचा प्रत्यक्ष संपर्क किंवा अन्य ठोस पुरावे मिळाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टल विभाग एकत्रितपणे तपास करत आहेत, तसेच आवश्यकतेनुसार सायबर व फोरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. नवनीत राणा यांनी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. अशा धमक्यांच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी राजकीय व सामाजिक नेत्यांकडून केली जात आहे.

गेल्या ऑगस्ट महिन्यात नवनीत राणा यांना समाज माध्यमावरील रीलच्या माध्यमातून अश्लील शब्दात शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी संबंधित खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली होती.