अमरावती : मुर्तिजापूर, दर्यापूर आणि अचलपूर या शहरांना जोडणारी ‘शकुंतला’ नॅरोगेज रेल्वे आता ब्रॉडगेज रुपांतरीत होणार असून या कामाचा ‘डीपीआर’ (डीपीआर) मंजूर झाल्याची अधिकृत माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीने गेल्या सात वर्षांपासून दिलेल्या लढ्याला निर्णायक यश मिळाले आहे.
२०१८ पासून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिती सातत्याने विविध आंदोलने, उपोषण आणि रास्तारोकोच्या माध्यमातून शकुंतला रेल्वेमार्गाच्या रखडलेल्या कामाकडे सरकारचे लक्ष वेधत आहे. २०२२ मध्ये ‘एफएलएस’ (फायनल लोकेशन सर्व्हे) मंजूर झाला होता, तरीही ‘डीपीआर’च्या मंजुरीअभावी प्रकल्पाचे काम रखडले होते. मात्र, समितीने सातव्या वर्षीही संघर्ष सुरूच ठेवला आणि त्यांच्या या अथक प्रयत्नांना अखेर यश आले.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक समितीचे प्रतिनिधी योगेश खानजोडे, डॉ. राजा धर्माधिकारी, विजय गोंडचवर आणि दयाराम चंदेले यांनी भुसावळ येथे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक पुनीत अग्रवाल आणि मुख्य अभियंता (निर्माण) संदीप सिन्हा यांची भेट घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात अचलपूर-मूर्तिजापूर मार्गाचा ‘डीपीआर’ मंजूर झाल्याचे स्पष्ट केले. या निर्णयाचे समितीने स्वागत करत रेल्वे प्रशासनाचे आभार मानले.
सामाजिक संघटनांचे मोलाचे सहकार्य
या आंदोलनात ‘माहेर फाउंडेशन’, ‘आदिवासी पर्यावरण संघटन’, ‘संस्कार भारती’, ‘मानव सेवा समिती’, ‘क्रांती ज्योती संघटन’, ‘जमाते इस्लामिक हिंद संघटन’, ‘मराठा सेवा संघ’ आणि व्यापारी संघटना यांसारख्या अनेक सामाजिक व स्वयंसेवी संघटनांनी मोलाचा सहभाग नोंदवला.
या संघर्षात योगेश खानजोडे, डॉ. राजा धर्माधिकारी, राजेश अग्रवाल, दिपाली विधले, राजेश पांडे, किरण गवाई, मुरलीधर ठाकरे, शंकर बारखडे, किरण वडूरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सक्रिय योगदान दिले.
सात वर्षांचा संघर्ष, कार्यकर्त्यांची चिकाटी आणि अथक प्रयत्न यामुळे शकुंतला रेल्वेच्या ब्रॉडगेज प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे. अचलपूर ते मूर्तिजापूर हा टप्पा मार्गी लागल्याने भविष्यात संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्याचा विश्वास समितीने व्यक्त केला आहे.
हा रेल्वेमार्ग रुंद झाल्यानंतर या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या चालवणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण झाल्यास विदर्भातील प्रवाशांना त्याचा लाभ घेता येणार आहे. ब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेल्या शकुंतला नॅरोगेज रेल्वेमार्गावरील वाहतूक गेल्या अनेक वर्षांपासून बंद असून हा मार्ग ब्रॉडगेजमध्ये रुपांतरीत व्हावा, अशी जुनी मागणी आहे. आता ‘डीपीआर’ मंजूर झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.