अमरावती : शहरातील दस्तूरनगर ते कंवरनगर मार्गावर मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या रात्री एक भीषण अपघात झाला. महाकाली मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या दोन मैत्रिणींना एका बेधुंद बोलेरो चालकाने मागून जबर धडक दिली. या धडकेत बोलेरोचे चाक अंगावरून गेल्याने एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे, दुसरी तरुणी जखमी झाली आहे
पायल बुंदेले (२२, रा. सबनीस प्लॉट, अमरावती) आणि तिची मैत्रीण वैष्णवी (गंभीर जखमी) या मंगळवारी रात्री दहा ते सव्वा दहा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून फर्शी स्टॉप परिसरातून कंवर नगरमार्गे महाकाली मंदिरात दर्शनासाठी निघाल्या होत्या. दुचाकी रस्त्याच्या बाजूने असतानाच मागून आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेमुळे पायल आणि वैष्णवी दोघीही रस्त्यावर पडल्या. यामध्ये पायल दुचाकीजवळ पडली, तर वैष्णवी काही अंतरावर फेकली गेली. त्याच क्षणी बेधुंद बोलेरो चालकाने आपले वाहन थांबवण्याऐवजी थेट वैष्णवीच्या अंगावरून नेले. यामुळे ती गंभीर जखमी झाली.
अपघात घडताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत बोलेरो चालक वाहनासह पसार झाला होता. नागरिकांनी तातडीने दोन्ही तरुणींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या बोलेरो चालकाने पुढे जाऊन अन्य एका दुचाकीलाही धडक दिल्याची चर्चा आहे, मात्र त्या दुचाकीस्वाराने अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही. या प्रकरणी तक्रारदार पायल बुंदेले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापेठ पोलिसांनी बोलेरो वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्याचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
बोलेरो चालकाचा शोध सुरू
तरुणींना धडक देणाऱ्या बोलेरो वाहनचालकाचा आम्ही युद्धपातळीवर शोध घेत आहोत. लवकरच त्याला अटक करण्यात येईल. या वाहनाने अन्य एक ते दोन दुचाकींना धडक दिल्याची चर्चा आहे, मात्र या तरुणींव्यतिरिक्त कोणीही आमच्यापर्यंत पोहोचले नाही. तरीही तपासादरम्यान आम्ही त्या बाबीचीही माहिती घेणार आहोत, असे पोलिसांनी सांगितले.
‘हिट अँड रन’च्या घटनांमध्ये वाढ
अलीकडच्या काळात अपघात झाल्यानंतर पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अशाच एका प्रकरणात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. संमती कॉलनी परिसरात ही घटना घडली होती. किशोरनगर परिसरातील रहिवासी भीमसेन वाहने कठोरा परिसरातील संमती कॉलनी येथून त्यांच्या दुचाकीने जात होते. यावेळी एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला होता.