अमरावती : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने दोघांचा बळी घेतला. चांदूर बाजार तालुक्यातील  फुगाव येथील अरुण वैराळे यांचे घर मंगळवारी सकाळी अचानक कोसळल्याने माय-लेकीचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.

चंदा अरूण वैराळे (३५) आणि पायल अरूण वैराळे (७), अशी मृतांची नावे आहेत. घर कोसळताच वैराळे कुटुंबातील पाचही सदस्य ढिगाऱ्याखाली अडकले. यात चंदा वैराळे आणि पायल यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य तिघांना गावकऱ्यांनी बाहेर काढले. तिघांची प्रकृती  गंभीर असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसामुळे घर कोसळल्याची माहिती मिळताच आपत्ती नियोजन पथक गावात पोहोचले. गावातील जी घरे कोसळण्याच्या स्थितीत आहे, अशा सर्वांना घर सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यांची व्यवस्था इतरत्र केली जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसातील जोरदार पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली आहे. शेतीलाही याचा फटका बसला आहे. १४ पैकी सहा तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. चांदूरबाजार वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये घरांची पडझड झाली आहे.