अमरावती : शासनाच्या बांधकाम कामगारांसाठी असलेल्या गृहपयोगी संच वाटप योजनेत गंभीर गैरव्यवस्थापनाचा अभाव असल्याचे समोर आले आहे. या संचासाठी कामगारांना तब्बल १६ तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील कामगारांना मोठा आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्व कामगारांना केवळ नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा येथे बोलावण्यात आल्यामुळे येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकच केंद्र, हजारो कामगार

या योजनेसाठी ऑनलाइन नोंदणी करताना केंद्र निवडण्याचा पर्याय उपलब्ध असूनही, प्रत्यक्षात केवळ दाभा येथेच संच वाटप सुरू आहे, असा आरोप संतप्त कामगारांनी केला आहे. परिणामी, ८ सप्टेंबर रोजी दाभा केंद्रावर प्रचंड गर्दी झाली होती. पूर्वीच्या ३ आणि ४ सप्टेंबरला संच न मिळालेल्या कामगारांसह ८ सप्टेंबरच्या नोंदणी केलेल्या कामगारांची उपस्थिती असल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. या वेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला होता.

संच वाटपाचे कंत्राट एका खासगी कंत्राटदाराला देण्यात आले असून, तो राज्यातील एका मोठ्या नेत्याचा जवळचा आहे, असा आरोप केला जात आहे. या कंत्राटदाराला यापूर्वीच्या कामात तोटा झाल्याने पुन्हा त्याच व्यक्तीला कंत्राट दिल्याची चर्चा आहे. यामुळे संचाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, एकाच केंद्रावर वाटप केल्याने अतिरिक्त खर्च वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही होत आहे.

‘…तर आम्ही आमच्या पद्धतीने’

प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शासनाच्या या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “जिल्ह्यात इतर तीन वितरण केंद्रे लवकरात लवकर सुरू झाली पाहिजेत. एकाच केंद्रावर वाटप सुरू असल्याने गर्दी वाढत आहे. जर इतर केंद्रे सुरू केली नाहीत, तर आम्ही आमच्या पद्धतीने वितरण प्रक्रिया मार्गी लावू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सहाय्यक कामगार आयुक्तांना या संदर्भात निवेदन दिले आहे. कामगारांना एकच ठिकाणी बोलावल्याने गर्दी होत असून कामगारांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रश्नावर लगेच तोडगा न निघाल्यास आंदोलन करण्यात येईल, त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असे निवेदनात म्हटले आहे.

कामगार संघटनांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली असून, सरकारने तालुका स्तरावर योग्य व्यवस्था करून कामगारांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.