अमरावती : येथील वडाळी परिसरात राज्‍य राखीव पोलीस दलाचे मुख्‍य कार्यालय आहे. या कार्यालयाच्‍या इमारतीत शनिवारी रात्री एक बिबट्या शिरला. पहाटेपर्यंत त्याचा वावर याच इमारतीत होता. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये या बिबट्याच्या हालचाली चित्रित झाल्या आहेत.

राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) वडाळी परिसरातील कार्यालयात बिबट्या शिरल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर वनविभागाचे बचाव पथक इमारतीत दाखल झाले, तेव्हा हा बिबट्या याच इमारतीत निवांतपणे फिरत होता. संपूर्ण इमारतीचा फेरफटका मारल्यानंतर हा बिबट्या नजीकच्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुंपण भिंतीवरून उडी मारून विद्यापीठ परिसरामधील झुडपांमध्ये पळून गेला, अशी माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

एसआरपीएफ कार्यालयाला लागूनच जंगल आहे. वडाळी, पोहरच्या जंगलात अलीकडच्या काळात बिबट्यांची संख्या वाढली आहे. जंगलात शिकार कमी उपलब्ध झाल्यास हे वन्यप्राणी शहरांकडे धाव घेतात. मानवी वस्त्यांजवळील कुत्रे हे त्यांचे भक्ष्य ठरतात. रात्रीच्या वेळी बिबट हे या कुत्र्यांची शिकार करतात. यापुर्वीही विद्यापीठाच्या परिसरात भरदिवसा बिबट्याचे दर्शन अनेकांना घडले आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसरात निर्देशक फलक देखील लावण्यात आले आहेत. त्यातच आता बिबट्याने काल रात्री एसआरपीएफच्या कार्यालयाचा फेरफटका मारला.

वडाळी, पोहरा जंगलाच्या परिसरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जंगल परिसराला लागून असणाऱ्या काही निवासस्थानाजवळ सायंकाळी देखील बिबट दिसतो. झुडपात, एखाद्या खड्ड्यात बिबट दडून बसतो. राज्य राखीव पोलीस दल वसाहतीमधले अनेक कुत्र्याची शिकार बिबट्यांनी केली आहे. परिसरात फिरणारा बिबट आता कार्यालयाच्या इमारतीत शिरला. यावेळी येथे सेवेवर असणारे कर्मचारी सुदैवाने त्याच्या समोर आले नाहीत म्हणून मोठा अनर्थ टळला. एसआरपीएफ कर्मचारी वसाहत परिसरात महिला, लहान मुलांमध्ये बिबटची दहशत आहे. बिबट्यांपासून संरक्षणाचे उपाय करण्याची मागणी होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला लागून असणाऱ्या तपोवन परिसरात डॉक्टर कॉलनी येथे गेल्या १५ जूनला बिबट्याने चक्क एका घराच्या गेटवरून घराच्या आवारात उडी घेतली. यावेळी घरच्या आवारात असणाऱ्या कुत्र्याची शिकार बिबट्याने केली होती. हा व्हिडिओ देखील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता. तपोवन, विद्यापीठ, राज्य राखीव पोलीस दल आणि महादेवखोरी या भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या भागातील नागरिकांनी या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.