अमरावती : अलायन्स एअर कंपनीच्या मुंबई-अमरावती-मुंबई या विमानसेवेचा शुभारंभ बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी अलायन्स एअरचे ७२ आसनी विमान धावपट्टीवर उतरले. विमान उतरताच अग्निशमन दलाने पाण्याचे उंच फवारे मारून पहिल्या विमानाचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर प्रवाशांना घेऊन विमान मुंबईच्या दिशेने झेपावले. पण, यावेळी लोकार्पण कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक शंका व्यक्त केली, त्याची चर्चा आता रंगली आहे.
अजित पवार म्हणाले, अलायन्स एअरने राज्यातील इतर विमानतळांवरून देखील प्रवासी विमानसेवा सुरू करायला हवी. अमरावती ते मुंबई ही सेवा आजपासून सुरू झाली, त्याचा आपल्याला आनंद आहे, पण ही सेवा अखंडपणे दिली जावी, अशी आपली सूचना आहे. कुठल्या कारणाने विमान फेरी रद्द झाली, तर प्रवाशांसाठी कंपनीने पर्यायी व्यवस्था करायला हवी. प्रवाशांना त्यांच्या तिकिटाची रक्कम देखील परत मिळायला हवी. विशेष म्हणजे मुंबई-अमरावती-मुंबई या प्रवासी विमानसेवेच्या वेळा प्रवाशांसाठी सोयीच्या नाहीत. त्यामुळे विमानसेवाच बंद पडण्याचा धोका आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्र्यांनी या बाबतीत लक्ष द्यावे, असे अजित पवार यांनी सांगितले.
अमरावती विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठल्याही वेळेत या ठिकाणी विमान उड्डाण आणि उतरण्याची सुविधा झाली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राम मोहन नायडू यांनी देखील आपल्या भाषणात वेळेचा संदर्भ दिला. मुंबई विमानतळावर विमानांची वर्दळ मोठी आहे. एकाचवेळी अनेक विमाने या ठिकाणी उतरतात. त्यामुळे अनेक शहरांसाठी सोयीच्या वेळा उपलब्ध होऊ शकत नाहीत. पण, नवी मुंबई विमानतळाचे काम पूर्णत्वास आले आहे. या ठिकाणी विमाने उतरण्यासाठी वेळ मिळू शकेल. अमरावतीहून सकाळी विमान उड्डाण झाल्यास परतीचे विमान सायंकाळी असणे आवश्यक आहे. लोक कार्यालयीन कामे आटोपून त्याच दिवशी परत येऊ शकतील, असे नायडू म्हणाले.
येत्या १८ एप्रिलपासून मुंबईहून दुपारी २.३० वाजता अमरावतीसाठी विमान निघणार असून दुपारी ४.१५ वाजता अमरावती विमानतळावर पोहचेल. अमरावतीहून मुंबईसाठी दुपारी ४.४० वाजता उड्डाण घेणार असून मुंबईला सायंकाळी ६.२५ वाजता पोहचेल. या वेळा अमरावतीकर प्रवाशांसाठी सोयीच्या नाहीत, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या.