अमरावती : रीलच्या माध्यमातून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमरावतीतील रील स्टार ‘राडा गँग’ला पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. त्यानंतर या रील स्टार्सनी अक्षरश: हात जोडून माफी मागितली असून इतरांनी अशा पद्धतीचे रील बनवू नयेत, अशी विनंती त्यांनी केली आहे. या माफीनाम्याचा व्हिडिओ देखील प्रसारीत झाला आहे.
समाज माध्यमांवर तरुणांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घालणारे काही रिल्स बनवण्याची फॅशनच आली आहे. शहराच्या अगदी मध्यभागी आणि गजबजलेल्या वस्तीत तसेच शहरामध्ये असे व्हिडिओ तयार केले जातात. ते समाज माध्यमांवर प्रसारीत केले जातात. असाच एक प्रकार अमरावती शहरात समोर आला. लोकांमध्ये दहशत निर्माण होईल, अशा रील तयार करून इन्स्टाग्राम खात्यावर प्रसारीत करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी या तरूणांचा शोध सुरू केला. राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली परिहारपुरा परिसरात हातात चाकू घेऊन रील बनविण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील तीन चायना चाकू जप्त करण्यात आले. सुरज अरूण रताळे (१९, रा. गजानन नगर, बिच्छू टेकडी), सुजल संजय मसराम (१९. रा. आदिवासी नगर) आणि स्वप्निल शरद उके (१९, रा. गजानन नगर) अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात फ्रेझरपुरा पोलिसांनी शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या टोळीला ‘राडा गँग’ अशी ओळख मिळाली होती. समाज माध्यमांवर दहशत माजविण्याचा हा प्रकार चर्चेत आला होता.
अमरावती शहरातील गुन्हेगारांवर पाळत ठेवतानाच त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिले आहेत. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांया मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, गजानन ढेवले, दीपक सुंदरकर, आस्तिक देशमुख, संग्राम भोजने, योगेश पवार, राजिक रायलीवाले, निलेश वंजारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अशा प्रकारे कोणीही अवैधरीत्या शस्त्रे बाळगून तसेच त्यासोबत छायाचित्रे, व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर प्रसारीत केल्यास किंवा लोकांमध्ये दहशत निर्माण होईल, असे कृत्य केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सार्वजनिक शांतता तसेच सुव्यवस्था बाधित होईल, असे कृत्य कोणीही करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.