अमरावती : येथील ‘पी.आर.पोटे पाटील कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स आयुर्वेद’ चे प्राचार्य डॉ. श्यामसुंदर भुतडा (५४) यांच्यावर तेथे काम करणाऱ्या एका महिलेनेने लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
मेट्रन पदावर पदोन्नती देण्याचे आमिष दाखवून डॉ. भुतडा यांनी तब्बल अडीच वर्षे वारंवार अत्याचार केल्याचे या पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर नांदगाव पेठ पोलिसांनी डॉ. भुतडा यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे शहरातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार पीडिता २०२२ पासून पोटे आयुर्वेदिक महाविद्यालयात कार्यरत होती. १६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ. भुतडा यांनी तिला पदोन्नतीचे आमिष दाखवले आणि कागदपत्रे घेऊन महाविद्यालयातील कार्यालयात बोलावले. मात्र त्यावेळी ते महाविद्यालयात नव्हते, म्हणून त्यांनी महिलेला त्यांच्या पोटे टाऊनशिप येथील घरी बोलावले. घरी पोहोचल्यावर डॉ. भुतडा यांनी तिच्यावर लैंगिग अत्याचार केला. जर विरोध केला तर नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. यामुळे तिचे कुटुंब रस्त्यावर येईल, अशी भीतीही दाखवली.
त्यानंतर डॉ. भुतडा यांनी ‘कमिटी येत आहे, तुला लवकरच मेट्रन म्हणून नोकरी मिळेल’, असे सांगून वारंवार अत्याचार केले. यात त्यांनी एका वस्तूच्या मदतीने अनैसर्गिक कृत्यही केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. एप्रिल २०२५ पर्यंत हा प्रकार सुरू होता.
एप्रिल २०२५ मध्ये डॉ. भुतडा यांनी पीडित महिलेच्या तरुण मुलीलाही आपल्याकडे शरीरसुखासाठी पाठवण्याची अमानुष मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. ‘तुझी मुलगी माझ्याच कृपेने चांगले शिक्षण घेत आहे,’ असे ते म्हणाले. या मागणीमुळे महिला चांगलीच हादरली. तिने मुलीला पाठवण्यास नकार दिल्याने डॉ. भुतडा यांनी तिला एप्रिल २०२५ पासून नोकरीवरून काढून टाकले.
या प्रकारानंतर महिलेला प्रचंड मानसिक त्रास झाला आणि ती आजारी पडली. उपचारासाठी ती महाविद्यालयात गेली असता, डॉ. भुतडा यांच्या तोंडी आदेशामुळे तिला उपचार देण्यासही नकार देण्यात आला. पीडितेने पोलिसात धाव घेतल्यानंतर या सर्व घटनांचा खुलासा झाला. नांदगाव पेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
संस्थेने संकेतस्थळावरून नाव हटवले
पी.आर.पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स अंतर्गत हे आयुर्वेदिक महाविद्यालय चालवले जाते. आरोपी प्राचार्य डॉ. श्यामसुंदर भुतडा यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘पी.आर.पोटे पाटील कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स आयुर्वेद’ च्या संकेतस्थळावरून त्याचे नाव हटविण्यात आले आहे.