अमरावती : अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज बुधवारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात आक्रमक आंदोलन केले. संतप्त शिवसैनिकांनी कृषी अधिकाऱ्यांच्या अंगावर सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पेंड्या फेकल्या.

जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून सोयाबीन, कापूस, तूर, अशी पिके पूर्णपणे कुजली आहेत. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच शासनाने ‘एक रुपया पिक विमा योजना’ बंद केल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. शासन, प्रशासनाकडून पंचनामे करण्यास विलंब करण्यात येत असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे होते.

जिल्हा कृषी अधिकारी आणि तहसीलदार यांनी तातडीने बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करावेत आणि अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा, कोणत्याही मंत्र्याला जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिला. जिल्ह्यात विविध भागांत पावसाची संततधार सुरू आहे. पीक कापणीच्या अवस्थेत असताना सातत्याने पाऊस कोसळत असल्याने पिकांची पूर्णपणे वाताहात झाली आहे. काही भागात सोयाबीनमध्ये हुमणीसह चक्रीभुंगा, खोडकीडीचा प्रादुर्भाव काही भागांत आढळला आहे. परिणामी शेतकऱ्यांना पुढील हंगामाचे नियोजन करताना आता सावकाराचेच उंबरठे झिजवावे लागतील, अशी परिस्थिती आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

सततच्या पावसाचा फटका इतरही पिकांना बसल्याने त्याच्या नियंत्रणासाठी शेतकरी वारेमाप खर्च करीत असल्याचे चित्र आहे. मात्र या साऱ्या प्रयत्नांतून त्यांच्या हाती काही लागेल, अशी आशादायक स्थिती नाही. नशिबवान ठरलेल्या काही शेतकऱ्यांच्या हाताला काही किलो किंवा क्‍विंटल माल लागला तरी बाजारात भाव नसल्याने त्यांच्याही उत्पादकता खर्चाची भरपाई होईल, असे वाटत नाही, असे शिवसैनिकांनी सांगितले.

या आंदोलनात जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांच्यासह नरेंद्र पडोळे, मनोज कडू, विजय ठाकरे, प्रमोद धनोकार, कपिल देशमुख, नितीन हटवार, शिवराज चौधरी, सचिन ठाकरे, वैभव मोहोकार, आदित्य ठाकरे, राजेश बंड, रामा सोळंके, गुणवंत गावंडे, किशोर नाते, मोहन बायस्कर, भास्कर धोटे, विनोद काकडे, विजय जामोदकर, विजय पाचघरे, दिलीप काळे, प्रदीप गौरखेडे, सतीश हरणे, मनोज साबळे, विजय तायडे, संजय पिंगळे, कैलास अवघड, प्रवीण रोडे, आणि अनेक शिवसैनिक तसेच शेतकरी सहभागी झाले होते.