मोहन अटाळकर, लोकसत्ता

अमरावती : गेल्या वर्षीची पीकविमा रक्कम न मिळाल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याने विमा प्रतिनिधीला मारहाण केल्याची घटना बुधवारी येथील जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात घडली. या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा >>> विधानपरिषदेच्या उमेदवारीवरुन शिवसंग्राम भाजपावर नाराज; अजूनही वेळ गेली नाही म्हणत विनायक मेटेंनी दिला इशारा

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पिकांचे नुकसान झाले होते. दर्यापूर येथे उडीद व मूग पीक पूर्णत: वाया गेले. शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांचा विमा काढला होता. परंतु, एक वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम न मिळाल्याने संतप्त झालेले शेतकरी आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख गोपाल अरबट यांनी पीक विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीला जाब विचारला. यावेळी जिल्हा प्रतिनिधींनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याने शिवसैनिकांनी त्यांना मारहाण केली.

हेही वाचा >>> आज महाराष्ट्रात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस; २७ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

काहींनी शिवसैनिकांची समजूत काढली. जोपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळत नाही तोपर्यंत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातून जाणार नाही, अशी भूमिका शिवसैनिक व शेतकऱ्यांनी घेतली. विम्याची रक्कम केव्हा मिळणार, याची लेखी माहिती विमा कंपनीने द्यावी, असा आग्रह शिवसैनिकांनी धरला.

हेही वाचा >>> “…तर महाराष्ट्रात यायची गरज भासणार नाही,” भाजपा नेत्याच्या ‘त्या’ मागणीनंतर मनसेने दिली प्रतिक्रिया

कृषी विभागाने सक्तीने शेतकऱ्यांना विमा काढायला लावला. परंतु, पेरणीचा हंगाम तोंडावर येऊनही मागील वर्षीचा पीक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले, असे सांगण्यात येत आहे.