अमरावती : अचलपूर तालुक्यातील मुसळधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत असताना चंद्रभागा नदीपात्रात दोन दुर्दैवी घटना घडल्या आहे. या घटनांमध्ये दोन व्यक्तींना जीव गमवावा लागला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पहिली घटना चमक सुरवाडा येथे घडली. चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे नदी दुथडी भरून वाहत असताना काल ज्ञानदीप पारिसे (वय ४२, रा. चमक सुरवाडा) यांचा पाय घसरून ते नदीपात्रात वाहून गेले. शोधमोहिमेनंतर रविवारी सकाळी त्यांचा मृतदेह सापडला. सरमसपूरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला आणि अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

ज्ञानदीप पारिसे हे काल नदीच्या काठावर गेले होते. अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते पुरात वाहून गेले. बचाव पथकाने काल त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. दरम्यान आज सकाळी त्यांचा मृतदेह नदीपात्रात आढळून आला. बचाव पथकाने मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

दुसरी घटना अरेगाव-खांजामानगर येथे घडली. चंद्रभागा नदीपात्रात रविवारी सकाळी आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृताचे नाव जनकलाल बाबू शेलुकर (रा. सोमठाणा) असे असून, मृतदेह अरेगाव-खांजामानगर परिसरातील नदीपात्रात दिसला. घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

आज सकाळी काही लोकांना जनकलाल यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. चौकशीनंतर मृतदेहाची ओळख पटली. काल रात्री जनकलाल हे पुरात वाहून गेले असावे, असा कयास व्यक्त करण्यात येत आहे. मुसळधार पावसामुळे अचलपूर तालुक्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यातच दोन जणांचा मृत्यू झाल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दोन दिवसांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोकमय वातावरण आहे. चंद्रभागा नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांना धोका टाळण्यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. सातपुडा पर्वतरांगांमध्ये आणि विशेषत: चंद्रभागा, शहानूर, सापन प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणाची दारे खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला आहे. पावसाळ्यात नदीपात्रातील वाढलेल्या प्रवाहात जाण्याचे धोके स्पष्ट होत असून नागरिकांनी अशा ठिकाणी जाऊ नये, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.