अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात सुरू करण्याला मंजुरी दिली आहे. त्याची उभारणी करण्यासाठी जागेचा शोध घेऊन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. तात्पुरत्या स्वरूपात हे उपकेंद्र एखाद्या महाविद्यालयामध्ये सुरू करण्याच्या दृष्टीने देखील चाचपणी केली जात आहे.
अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोल्यात सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी भाजप प्रतोद आ. रणधीर सावरकर उपस्थित होते. अमरावती विद्यापीठाचे कार्यक्षेत्र व प्रशासनाचा व्याप लक्षात घेता अकोल्यात उपकेंद्र सुरू करण्याची जुनीच मागणी आहे.
या संदर्भात आमदार रणधीर सावरकर अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूंना प्रस्ताव तातडीने शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यासाठी सोयीस्कर होणार आहे. विद्यापीठांतर्गत ४४१ महाविद्यालयांपैकी २२१ महाविद्यालये तसेच ४५ टक्के विद्यार्थी संख्या या तीन जिल्ह्यांमध्ये आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील महाविद्यालयाचे अमरावतीपर्यंतचे अंतर २०० कि.मी. पेक्षा जास्त आहे.
विद्यापीठ कामासाठी वारंवार अमरावतीला जाणे महाविद्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व पालकांसाठी प्रचंड गैरसोयीचे व आर्थिक भुर्दंड बसणारे ठरत आहे, असे मुद्दे आ. सावरकर यांनी बैठकीत उपस्थित केले. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील अकोला येथे उपकेंद्रासाठी जागा शोधण्याच्या सूचना केल्या. उपकेंद्र तातडीने सुरू करण्यासाठी एखाद्या महाविद्यालयाचा पर्याय देखील सादर करण्याचे त्यांनी सांगितले.
उपकेंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर पुढील कार्यवाही व आराखड्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती तयार करावी, येत्या मंगळवारपर्यंत उच्च व तंत्र शिक्षण कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात यावा, आदी सूचना मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
विद्यापीठाच्या संथ कारभारावर प्रचंड नाराजी
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रशासनाच्या संथ कारभारावर आमदार रणधीर सावरकर यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी अधिवेशनामध्ये विद्यापीठाच्या उपकेंद्राचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उपकेंद्र अकोला येथे सुरू करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले होते. त्याची पूर्तता करण्यासाठी मंत्र्यांच्या दालनात विद्यापीठासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. आता उपकेंद्र स्थापन होण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला असून हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.