अमरावती : आमदार रवी राणा यांनी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी दिवाळीचा ‘किराणा’ पाठवून राजकीय खोडी काढल्यामुळे राणा दाम्पत्य आणि ठाकूर यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच उफाळून आला आहे.

रवी राणा यांच्या या कृतीने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी राणा दाम्पत्याला थेट ‘भैया-भाभीनं औकातीत राहायचं,’ असा खणखणीत इशारा दिला आहे.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, मी पहिल्यांदा पराभूत झालेली नाही. मी पराभूत झाले, किंवा जिंकली, मला काही फरक पडत नाही. मी पक्ष बदलत नाही. सरड्यासारखे रंग बदलत नाही. तुम्ही तुमच्या ‘औकातीत’ राहा एवढे तुम्हाला सांगते. पुन्हा कधी अशी भानगड केली, तर तुम्हाला असे उत्तर देईल की, तुम्ही याद राखाल. काही ‘विचित्र’ लोक गेल्या दहा वर्षांत राजकारणात आल्यामुळे अमरावतीचे नाव खराब झाले आहे, असा टोलाही ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला लगावला.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, राणा दाम्पत्य हलकटपणाची वागणूक ते देतात. मलाही या दिवाळीत त्याचा अनुभव आला. हे चित्र-विचित्र लोक आहेत. नवरा कुठे? बायको कुठे? कधी सत्तेमध्ये? कधी आमच्या पाठिंब्याने, कधी भाजपच्या पाठिंब्याने राजकारण करत असतात. हलकटासारखा माझ्या घरी किराणा पाठवला. शाळांमध्ये जे काही तेल वाटले जाते, तेच या किराणाच्या थैलीमध्ये आहे. परत जर असे केले, तर चांगले उत्तर मिळेल. माझ्या वडिलांनी कधी बारदाना चोरला नाही. मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे. मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे करत नाही. तुम्ही जर, असे चिल्लर धंदे करत असाल, तर त्याचे उत्तर आम्हाला देता येते, असे ठाकूर यांनी सुनावले.

यशोमती ठाकूर म्हणाल्या, शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे, हरामखोरानो! असा आमचा अपमान खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांना काय मदत करायची ती करा. त्यांना मदतीचे पैसे देता येईना, अन् अशा भानगडी करता. हे चिल्लर धंदे तत्काळ बंद झाले पाहिजेत, असा सूचक इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.

जनतेच्या भावनांचा अपमान करून राजकारण करणाऱ्यांना अमरावतीकर कधीच माफ करणार नाहीत. राणा दांपत्यांने आपली राजकीय नाटकबाजी थांबवावी, अन्यथा लोकच त्यांना योग्य जागा दाखवतील, असा इशाराही ठाकूर यांनी दिला आहे. राणा-ठाकूर यांच्यातील या नव्या वादाने अमरावतीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.