चंद्रपूर : राज्यातील सर्वात मोठे शिवलिंग असल्याचा दावा असलेल्या भिवापूर येथील शिवलिंगावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून जलाभिषेक केला. अमृता फडणवीस यांच्या हस्ते ५५ नद्यांचे पवित्र जल आणि १ लाख ५५ हजार बेलपत्र यावेळी अर्पण करण्यात आले.
देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून पहिल्या श्रावण सोमवारी आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाचा जलाभिषेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ५५ नद्यांचे पवित्र जल आणि १ लाख ५५ बेलपत्र अर्पण करण्यात आले. या भव्य धार्मिक कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांच्या पत्नी तथा माजी मंत्री शोभा फडणवीस यांची यावेळी उपस्थिती होती. ही एक जागृत देवस्थान असल्याची अनुभूती झाल्याचे अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत ३५५ हून अधिक विविध सेवाभावी उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून भिवापूर वॉर्डातील प्राचीन आणि राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाच्या रुद्राभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील नामवंत पंडितांना आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस आज चंद्रपुरात दाखल झाल्या. सायंकाळी चार वाजता त्या कार्यक्रमस्थळी पोहोचल्या.
कावड घेऊन त्या शिवलिंगाजवळ आल्या आणि राज्यभरातून आणलेल्या ५५ नद्यांच्या पवित्र जलाने व १ लाख ५५ हजार बेलपत्रांनी शिवलिंगाचे जलाभिषेक केले. त्यानंतर त्यांनी शिवलिंगाची आरती केली. यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “चंद्रपूर ही विविध रूपातील सौंदर्याने नटलेली नगरी आहे. हे सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. त्याचा विकास व्हायला हवा. मी वर्षातून किमान दोनदा तरी चंद्रपूरला भेट देईन, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी महामृत्युंजय मंत्राचे पठण केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे कौतुक केले.